जळगाव : भुसावळ येथील रेल्वेच्या क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेमध्ये दीडशे प्रशिक्षणार्थींना सोमवारी (दि.३०) रात्री अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी झोपी गेले. मात्र, पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्यांना पोटदुखी, उलट्या, जुलाब, डोकेदुखी, चक्कर येणे, असा त्रास जाणवू लागला. सध्या १३० जणांवर रेल्वे रुग्णालयात, तर १२ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील या संस्थेत मध्य रेल्वेचे अनेक कर्मचारी प्रशिक्षणासाठी येतात. सोमवारी रात्री ७:३० ते ९:३० या वेळेत प्रशिक्षणार्थींना डाळ, पोळी, राजमा, भेंडीची भाजी, भात आणि सुजी हलवा असे जेवण देण्यात आले होते. हे जेवण घेतल्यानंतर कर्मचारी आपापल्या खोलीत झोपी गेले. मात्र, मध्यरात्री अचानक अनेकांची प्रकृती बिघडली. काहींनी जेवणातील भेंडीच्या भाजीत किडे असल्याचेही निदर्शनास आणून दिले होते. घटनेची माहिती मिळताच डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींची भेट घेतली. या ठिकाणी १३० तर खाजगी रुग्णालयातमध्ये १२ उपचार सुरू आहेत.