

नाशिक : नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होताच शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांबाहेर सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषतः उमेदवारी अर्ज स्वीकृतीच्या काळात होणारे शक्तिप्रदर्शन तसेच माघारीच्या दिवशी निर्माण होऊ शकणारे तणावपूर्ण प्रसंग टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर पंचवटी, सरकारवाडा, नाशिकरोड व अंबड विभागातील सहाय्यक पोलिस आयुक्तांसह शहरातील तेरा पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आपापल्या हद्दीत बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन करत आहेत. याचबरोबर गुन्हे शाखा, विशेष शाखा तसेच गोपनीय शाखेची पथके संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवणार आहेत.
नाशिक महानगरपालिकेच्या ३१ प्रभागांमधून १२२ नगरसेवकांची निवड होणार असून, त्यासाठी दहा ठिकाणी प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी स्थानिक पोलीस ठाणे व शहर पोलीस मुख्यालयाकडून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. गरज भासल्यास व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार त्या त्या वेळी बंदोबस्त व अंमलदारांची संख्या वाढविली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी चारित्र्य पडताळणीसाठी पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी केली असून, एकीकडे निवडणुकीची प्रशासकीय तयारी तर दुसरीकडे कडेकोट पोलीस बंदोबस्त अशी दुहेरी यंत्रणा कार्यरत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे ठिकाणे
प्रभाग १, २, ३ – कै. पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय (प्रभाग समिती सभागृह)
प्रभाग ४, ५, ६ – कै. पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय (दुसरा मजला, पाणीपुरवठा विभाग)
प्रभाग ७, १२, २४ – नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय, पंडित कॉलनी
प्रभाग १३, १४, १५ – नाशिक पूर्व विभागीय कार्यालय, मेनरोड
प्रभाग १६, २३, ३० – अटल दिव्यांग स्वाभिमान भवन, श्रीवल्लभनगर, मुंबई नाका
प्रभाग १७, १८, १९,२०, २१, २२ नाशिक रोड विभागीय कार्यालय
प्रभाग २५, २६, २८,२७, २९, ३१ – नवीन नाशिक विभागीय कार्यालय, अंबड पोलिस ठाण्यासमोर
प्रभाग ८, ९, १०, ११ – सातपूर विभागीय कार्यालय,