

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील गुरूनानक छात्रालय हे वसतिगृह शोधून दाखवा आणि पाच लाख रूपयांचे बक्षीस मिळवा अशी घोषणा तक्रारदार विठोबा द्यानद्यान यांनी केली आहे. विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरुनानक छात्रालय, टोकडे प्रकरणात जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी सादर केलेल्या अहवालावर द्यानद्यान यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. हा अहवाल तथ्यदडपशाही करणारा, कायद्याचा चुकीचा अर्थ लावणारा व आरोपींना संरक्षण देणारा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
द्यानद्यान यांनी सांगितले की, स्थानिक विद्यार्थी प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. 7 ऑक्टोबर 2025 रोजी वस्तीगृहात स्थानिक विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे बाहेरगावचे दाखवून अनुदान घेतले गेल्याचे पुरावे देऊन चौकशी करण्याची लेखी मागणी केली होती. मात्र, या गंभीर मुद्द्याचा 22 डिसेंबरच्या अहवालात कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. हे संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या इमारतीचा वापर वस्तीगृह म्हणून दाखवण्यात आला, त्या इमारतीचे मालक वाल्मीक प्रताप दराखा यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी लेखी स्वरूपात ‘माझे गावात वडिलोपार्जित एकच घर आहे. केवळ 864 स्क्वेअर फूट जागेत आम्ही दोघे भाऊंचा परिवार, आई एकत्र राहतो. तसेच त्या जागेवर पिठाची गिरणीही चालवतो सदर जागा आम्हालाच अपूर्ण पडते. त्यामुळे कोणत्याही संस्थेला किंवा वसतिगृहासाठी घर कधीही भाड्याने दिलेले नाही’ असे स्पष्ट जाहीर केले आहे. हा थेट पुरावा असूनही त्याचे कायदेशीर परिणाम अहवालात दडपण्यात आल्याचा आरोपही द्यानद्यान यांनी केला.
या प्रकरणी अहवाल प्राप्त झाला असून त्याची फेरपडताळणी केली जाईल. समितीच्या अहवालातील ग्रामस्थ व लाभार्थ्यांच्या अभिप्रायावर शंका कशी घेणार हा प्रश्न आहे.
ओमकार पवार (मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)
इमारत दाखवा पाच लाख बक्षीस मिळवा - टोकडे येथील 1983 पासून सुरू केलेल्या व माझ्या तक्रारीनंतर चौकशी अंती 23 डिसेंब 2022 रोजी मान्यता रद्द केलेल्या गुरुनानक छात्रालयाची तथाकथित वस्तीगृह इमारत प्रत्यक्षात कुठे आहे ते प्रशासनाने दाखवावे. जर अशी अधिकृत वस्तीगृह इमारत अस्तित्वात असल्याचे सिध्द झाले, तर ती इमारत दाखवणाऱ्यांस मी स्वतः ५ लाखांचे बक्षीस देईन.
- विठोबा द्यानद्यान, तक्रारदार, नाशिक