Bhusawal Shocking News
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १४ वर्षांच्या दोन शाळकरी मैत्रिणींचे मृतदेह साकरी गावाजवळील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी एका १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हे तिघेही 'आत्महत्या' करण्याच्या उद्देशाने एकत्र गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
भुसावळ तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की भुसावळ तालुक्यातील साकरी गावातील दोन मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळालीमयत मुली या अवघ्या १४ वर्षांच्या असून त्या आपापल्या घरातून ट्युशनसाठी बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या घरी न परतल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला होता. शोधाशोध सुरू असतानाच आज सकाळी
साकरी शिवारात आज (दि. २८) दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आले. काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि ग्रामस्थांच्या चर्चेतून समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित १७ वर्षीय मुलाचे यातील एका मुलीशी प्रेमप्रकरण होते. या प्रकरणाची गावात वाच्यता झाल्यास बदनामी होईल, या भीतीपोटी तिघांनी (दोन मुली आणि तो मुलगा) आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
मुली बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली. साकरी ग्रामपंचायत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात धक्कादायक दृश्य कैद झाले. दोन्ही मुली त्या १७ वर्षीय मुलासोबत जाताना दिसत आहेत. या आधारे पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे.
गावात आणि परिसरात सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. तिघांनी मिळून आत्महत्या करण्याचे ठरवले होते, असे समोर येत असले तरी, "त्या मुलानेच दोघींना विहिरीत ढकलले," अशी कुजबूज देखील नागरिक करत आहेत. मुलगा जिवंत आहे आणि दोन मुलींचा मृत्यू झाला आहे, यामुळे संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रवाना केले. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण आहे की घातपाताचे? याचे सत्य लवकरच पोलीस तपासात उघड होईल. मात्र, कोवळ्या वयातील मुलांच्या या टोकाच्या निर्णयाने हळहळ व्यक्त होत आहे.
गावातील लोकांनी ज्या विहिरीमध्ये मुलींचे प मृतदेह सापडले त्या ठिकाणी ठिय्या मारून त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करीत आहे यामुळे वातावरण तापलेले असून घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा तालुका पोलीस स्टेशन व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.