Ashok Kharat pudhari
नाशिक

Ashok Kharat Case | भोंदू अशोककुमार खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी; नाशिक कोर्टाचा मोठा दणका

Ashok Kharat Case | अहिल्यानगरचे कापड व्यावसायिक फसवणूक प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदू अशोककुमार खरात याला फसवणुकीच्या एका प्रकरणात सरकारवाडा पोलिसांनी अटक केल्यानंतर बुधवारी (दि. ३०) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून खरात याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

खरातकडून एका अजामीनपात्र गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच त्याला पुन्हा फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी मिळाल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. अहिल्यानगरच्या नेवासा येथील एका कापड व्यावसायिकाची खरात याने नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात 'ओकस प्रॉपर्टीज' या नावाने कार्यालय थाटून फसवणूक केल्याची तक्रार सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

संबंधित व्यावसायिकाकडून सन २०२२ ते २०२६ या कालावधीत व्यवसायाच्या भरभराटीसाठी देवीचा मंत्र टाकून देण्याच्या बहाण्याने खरात याने कथितरीत्या रक्कम उकळल्याचे तक्रारीत नमूद आहे. खरात याने फिर्यादीला त्याच्याकडे असलेल्या अंगठ्या मौल्यवान रत्नांच्या असल्याचे सांगितले. दोन अंगठ्या घेऊन त्याचा अपहार करण्यात आला.

त्यानंतर बनावट पितळी अंगठ्यांमध्ये रत्न टाकून त्या देत फसवणूक केल्याचा आरोप आहे. या माध्यमातून तब्बल २ लाख ६२ हजार रुपयांची रोकड उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय खरात याने ७५ हजार रुपये एका खड्याच्या मोबदल्यात उकळल्याचेही तक्रारीत नमूद आहे. संशय आल्यानंतर तक्रारदाराने त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर खरात याने पोलिसांत तक्रार होण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला कार्यालयात बोलावून घेतल्याचे समोर आले.

दरम्यान, पोलिसांनी खरात याच्यावर यापूर्वीही कारवाई केली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. १९ मार्च रोजी त्याच्याकडील अंगठ्यांची पडताळणी केली असता त्या बनावट व पितळी धातूच्या असल्याचे निष्पन्न झाले.

तसेच पुष्कराज व अन्य रत्नांची किंमत पाच हजार रुपये असल्याचेही समोर आले. फसवणुकीची खात्री पटल्यानंतर तक्रारदाराने सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत खरातकडून या फसवणूक प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बनावट रत्नांचा वापर आणि अन्य संबंधित बाबींची चौकशी केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT