Ashok Kharat Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case Nashik | भोंदू खरातवर 14 वा गुन्हा दाखल! मंदिर उभारणीच्या नावाखाली 16 एकर जमीन हडपली

Ashok Kharat Case Nashik | भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांचा पर्दाफाश होत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांचा पर्दाफाश होत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिन्नर ठाण्यात खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या विरोधात फसवणुकीचा चौदावा गुन्हा दाखल करण्यात आला.

या नव्या गुन्ह्यामुळे खरातचे पाय आणखी खोलात गेले असून, सित्रर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २००३ ते फेब्रुवारी २००४ दरम्यान सिन्नर तालुक्यातील मिरगाव परिसरात मंदिर उभारण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली.

अशोक खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करीत, तुमच्या शेतजमिनीवर मंदिर उभारायचे आहे. असे सांगून शेतकऱ्यांना भूलथापा दिल्या. मंदिर उभारणीला विरोध केल्यास जादूटोणा करून नुकसान करण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी जमीन विक्रीस संमती दिली. त्यानंतर अशोक खरात आणि कल्पना खरात यांनी सुमारे १६.५० एकर जमीन अवघ्या १५ लाख रुपयांत खरेदी केल्याचे समोर आले.

या जमिनीवर ईशान्येश्वर मंदिर, फार्म हाउस व आंब्याची बाग उभारल्याची माहिती आहे. या व्यवहारात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, खरातवर आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, महिलांवरील लैंगिक अत्याचार, फसवणूक व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. एका प्रकरणात गर्भवतीवर अत्याचार केल्याचा आरोप असून, त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

सध्या खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, तपास यंत्रणा पुढील कारवाईस सज्ज आहे. या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT