Ashok Kharat  pudhari
नाशिक

Bhondu Ashok Kharat | भोंदू अशोक खरातचे परराज्यातही जाळे; नाशिक-शिर्डी महामार्गावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेटी

Bhondu Ashok Kharat | नाशिक - शिर्डी महामार्गावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलांशी गुप्त भेटी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निखिल रोकडे
महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खरातचे कथित 'कनेक्शन' केवळ नाशिक आणि नगर जिल्ह्यापुरते मर्यादित नसून, परराज्यातील काही महिलांशीही त्याचे अत्यंत खासगी स्वरूपाचे संबंध असल्याचे तपासातून पुढे आल्याचे समजते.

या महिलांच्या भेटीसाठी खरातने स्वतंत्र व्यवस्था केल्याचीही माहिती असून, नाशिक - शिर्डी महामार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याच्या काही गुप्त भेटी होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खरातविरोधात महाराष्ट्रातील विविध भागांतून महिलांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे.

मात्र, तपासाची व्याप्ती वाढविताना खरातचे संपर्क परराज्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती तपास यंत्रणांच्या निदर्शनास आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, संबंधित महिला खरातला भेटण्यासाठी शिर्डी येथे पूजा, विशिष्ट विधि अथवा दर्शनासाठी जात असल्याचे कारण कुटुंबीयांना सांगत असत. त्यामुळे त्यांच्या हालचालींबाबत घरच्यांना संशय येत नसल्याची माहिती समोर आली आहे.

परराज्यातील महिलांनी तक्रारी का केल्या नाहीत?

खरात तपासामध्ये खरातशी संबंधित ज्या महिला संपर्कात होत्या, त्यांच्याकडे पोलिस यंत्रणेने चौकशी केली, त्यातील काही महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या मात्र, अनेक महिलांनी तक्रारी देण्यासाठी नकार दिला. यासाठी मुख्य कारण बदनामी होऊन आपले जे सध्याचे वैवाहिक जीवन सुरू आहे हे उद्ध्वस्त होईल हे मुख्य कारण होय.

खरातच्या कथित गैरप्रकारांची चर्चा महाराष्ट्राच्या विविध भागांत होत असताना परराज्यातील महिलांकडून अद्याप अशा प्रकारची स्वतंत्र तक्रार दाखल झालेली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या महिलांनी तक्रारी का केल्या नाहीत, त्यांच्या खरातशी नेमक्या कोणत्या माध्यमातून ओळखी झाल्या, त्यांना कोणत्या कारणाने भेटीसाठी बोलावले जात होते आणि या संबंधांचे स्वरूप काय होते, याबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

धार्मिक विधींच्या आड नेमके काय?

सूत्रांच्या माहितीनुसार, खरात काही महिलांना धार्मिक विधी, पूजा किंवा अन्य कारणांचा आधार देत आपल्या संपर्कात ठेवत होता. त्यानंतर प्रत्यक्ष भेटीसाठी विशिष्ट ठिकाणांची व्यवस्था केली जात असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जाते. नाशिक - शिर्डी महामार्गावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये अशा काही महिलांशी त्याच्या भेटी होत असल्याची माहितीही तपासात समोर आल्याचे समजते.

या भेटींमध्ये विधी अथवा पूजेच्या नावाखाली महिलांचे कथित लैंगिक शोषण करण्यात आले का, याचा तपास विशेष तपास पथकाने केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील कथित प्रकाराची व्याप्ती लक्षात घेता, खरातच्या संपर्कातील महिलांची संख्या, त्यांच्याशी संपर्क साधण्याची पद्धत, भेटींची ठिकाणे आणि या भेटींमागील नेमका उद्देश याची माहिती तपास यंत्रणेने गोपनीय पद्धतीने संकलित केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाशिक - अहिल्यानगरच्या पलीकडेही खरातचे जाळे पसरले होते का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

महिला खरातला भेटण्यासाठी शिर्डीला

सूत्रांच्या माहितीनुसार, काही महिला खरातला भेटण्यासाठी शिर्डीला धार्मिक विधी, पूजा किंवा दर्शनासाठी जात असल्याचे कुटुंबीयांना सांगत असत. त्यामुळे प्रत्यक्षात त्या कुठे जात आहेत आणि कोणाला भेटत आहेत, याबाबत घरच्यांना कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले जाते. या कथित दुहेरी आयुष्यामुळे संशयाची सुईही कुटुंबीयांपर्यंत पोहोचत नसल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT