मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारताच जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी प्रशासकीय कामकाजाला शिस्त लागावास सुरुवात केली आहे. शनिवारची सुटी असतानाही त्यांनी शनिवारी (दि. ३१) पदभार स्वीकारून सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर महापालिका इमारतीच्या परिसरातील अस्वच्छता आणि भिंतींवर साचलेली जाळी पाहून त्यांनी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
केवळ आश्वासने नकोत, प्रत्यक्ष कामातून स्वच्छता दिसायला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. महापालिका परिसर एका तासात स्वच्छ करण्याचे आदेश देतानाच तीन दिवसांत शहरातील स्वच्छतेची कामे मार्गी लावण्याची मुदतही दिली.
विभागप्रमुखांच्या बैठकीनंतर दालनाबाहेर पडलेल्या विसपुते यांना महापालिका आवारात ठिकठिकाणी कचरा आणि इमारतीवर जाळी साचल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत जाब विचारला. सहायक आयुक्त अनिल पार्कले यांनी सोमवारपर्यंत स्वच्छता करण्याचे सांगितल्यानंतर विसपुते यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत फटकारले.
सोमवारपर्यंत वाट कशाला पाहता? एका तासात परिसर स्वच्छ करा. स्वच्छतेसाठी शिडी आणून देऊ का? अशी विचारणा करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. तोंड चालविण्यापेक्षा हातपाय चालवून कामे करा, अशा शब्दांत त्यांनी सुनावले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासण्याबरोबरच अधिकृत कर्मचाऱ्यांऐवजी अन्य व्यक्तींकडून कामे करून घेतली जात आहेत का, याचीही पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना मास्क, हँडग्लोअज आणि अन्य आवश्यक साहित्य मिळते का, याची माहिती घेतली. काम करताना सुरक्षेच्या साधनांचा वापर करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली असता, त्यावर लवकरच चर्चा करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त डॉ. सुनीता कुमावत, तौसिफ शेख, साजिद अंसारी, दिनेश मोरे आदी उपस्थित होते.
मनपाचे तत्कालीन आयुक्त रवींद्र जाधव यांना लाचखोरीच्या आरोपातून अटक केली होती. त्यानंतर आयुक्तपद रिक्त झाल्याने प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी विसपुते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या कार्यभाराची सूत्रे स्वीकारताच त्यांनी प्रशासनातील शिस्त, पारदर्शकता आणि प्रत्यक्ष कामांना प्राधान्य दिल्याचा दिसून आले.
विभागप्रमुखांच्या बैठकीत विसपुते यांनी कामकाजाचा आढावा घेत नियमांच्या चौकटीतच काम करण्याचे निर्देश दिले. नियमबाह्य कामे केल्यास संबंधितांविरोधात कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा इशाराही त्यांनी दिला. बैठकीत विभागप्रमुखांशिवाय उपस्थित असलेल्यांना बाहेर जाण्यास सांगत त्यांनी प्रशासकीय शिस्तीचा प्रत्यय दिला.