

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव - कुसुंबा रस्त्यावरील टिंगरी फाट्याजवळ बुधवारी (दि. २८) सायंकाळी दुचाकी आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. राजू नाना माने (४५), बालाबाई राज्यू माने आणि भटाबाई राजेंद्र माने (१८, तिघे रा. तिसगाव, पो. देवभाने, ता. जि. धुळे) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
माने कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी नांदगाव येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून ते दुचाकीने धुळ्याच्या दिशेने परतत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास टिंगरी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीची (एमएच १८, एल २१५०) हिला समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप (एमएच १८, एचवाय ०२०३) ने धडक दिली.
या अपघातात राजेंद्र माने, बालाबाई माने आणि भटाबाई माने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी मारुती विठ्ठल माने यांनी मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, पिकअपचालक सागर थोरात (रा. कंक्राळे, ता. मालेगाव) हा अपघातानंतर घटनास्थलाहून फरार झाल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अपघातात दुचाकी आणि पिकअप वाहनाचीही नुकसान झाले.
याप्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती मिळताच मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थलळी धाव घेत मृतांच्या कुटुबियांचे सांत्वन केले. पोलिस उपनिरीक्षक दामोदर काळे पुढील तपास करत आहेत.