नाशिक : शहरातील ऐतिहासिक बी. डी. भालेकर शाळा जीर्ण झाल्याने ती पाडावी लागेल. परंतु, शाळेच्या जागेवर शाळाच उभी रहावी, अशी नाशिककरांची भावना असून त्याच्याशी मी सहमत आहे. यासंदर्भात मी स्वत: आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी चर्चा केली आहे. इमारत जीर्ण असेल तर पाडायला हरकत नाही, परंतु, नाशिककरांची भावना लक्षात घेता या ठिकाणी पुन्हा शाळा बांधावी, अशी सूचना मी आयुक्तांना करणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. नाशिककरांच्या या भावना मी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासनही भुसे यांनी बी. डी. भालेकर शाळा बचाव समितीला दिले आहे.
ऐतिहासिक बी. डी. भालेकर शाळेचा वाद आता ऐरणीवर आला आहे. भालेकर शाळेच्या जागेवर विश्रामगृह उभारण्याचा महापालिकेचा डाव उघड झाल्यानंतर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी बी. डी. भालेकर शाळा बचाव समिती स्थापन करत आंदोलन उभारले आहे. या समितीने शनिवार (दि. ८) मंत्री भुसे यांची भेट घेत, या ठिकाणी शाळाच उभारावी, अशी मागणी केली. त्याबाबत भुसे यांनीही आता सकारात्मक भूमिका घेतली आहे. भुसे म्हणाले की, भालेकर शाळा पाडून विश्रामगृह उभारण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात मला नाशिकमधून अनेक फोन आले आहेत. अनेकांनी या ठिकाणी शाळाच उभारावी अशा सूचना मला केल्या आहेत. त्यामुळे आयुक्त खत्री यांच्याशी मी स्वत: बोललो असून त्यांनी शाळा चार वर्षांपासून बंद असल्याने शाळा जीर्ण झाल्याने तसेच ती धोकेदायक बनल्यामुळे पाडकाम केले जात असल्याचे मला सांगितले. शाळा इमारत जुनी असेल तर ती पाडून तेथे पुन्हा शाळा उभी करावी, अशी नाशिककरांची भावना आहे. नाशिककरांच्या भावनेशी मी सहमत असून येथे पुन्हा शाळा उभी करावी, अशा सूचना मी आयुक्त खत्री यांना करणार असल्याचे आश्वासन भुसे यांनी समितीला दिले.
वाद मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार
नाशिककरांच्या या भावना मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यत पोहचणार असल्याचे आश्वासनही भुसे यांनी समितीला दिले आहे. भावना आहे. त्या ठिकाणी त्याच नावाने शाळा असावी, या भावना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार आहे. त्यामुळे शाळा पाडकामाचा वाद आता थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या दरबारापर्यंत पोहचणार असल्यामुळे विश्रामगृह उभारण्याचा प्रस्ताव तूर्त बारगळण्याची शक्यता आहे.