

नाशिक : शहराच्या मध्यवस्तीतील बी. डी. भालेकर शाळेची इमारत पाडून त्याजागी विश्रामगृह उभारण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. भालेकर शाळा पूर्ववत सुरू न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना(शिंदे गट) व काँग्रेस पक्षाने दिला आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली बी. डी. भालेकर शाळा नगरपालिका काळात सुरू झाली होती. कै. भालेकर यांनी दिलेल्या भरीव देणगीतून या शाळेची इमारत उभी राहिली. गरीब, कष्टकऱ्यांच्या पाल्यांना या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असे. कला, क्रीडा, सांस्कृतिक विषयात या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्तृत्व गाजवून शाळेच्याच नव्हे तर या शहराच्या लौकीकातही भर घातला.
मागासवर्गीय, आदिवासी, बारा बलुतेदारांच्या पाल्यांसाठी ही शाळा म्हणजे खऱ्या अर्थाने 'गुरूकुल' होते. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही शाळा बंद पडली. या ठिकाणी सुरुवातीला बीओटीवर व्यापारी संकुल व त्यानंतर पूर्व विभागीय कार्यालय उभारण्याचे प्रयत्न झाले. मात्र त्यास विरोध झाल्याने महापालिकेला निर्णय बदलावा लागला होता. आता सदर शाळा इमारत धोकेदायक बनल्याचे सांगून त्या जागेवर विश्रामगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या इमारतीचे पाडकामही सुरू होत आहे. महापालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. शिवसेना, काँग्रेसने महापालिकेच्या या निर्णयाविरोधात उघड भूमिका घेत निर्णय रद्द न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. पंचशीलनगर, भीमवाडी, खडकाळी, जुने नाशिक, द्वारका परिसरातील हजारो विद्यार्थी शिकायला होते. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शाळा बंद पडली. ही शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले होते. सदर शाळा इमारत पाडून त्याठिकाणी विश्रामगृह उभारण्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन उभारले जाईल.
दीपक डोके, शिवसेना (शिंदे गट)
भालेकर नामक शेंगा विक्रेत्याने आपल्या कष्टातून उभारलेल्या निधीतून या शाळेचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळेच या शाळेला बी. डी. भालेकर असे नामकरण करण्यात आले होते. गरीब मराठी माणसाने उभी केलेली ही वास्तू धोकेदायक बनल्याचे सांगून त्या जागेवर विश्रामगृह उभारण्याचा घाट महापालिका प्रशासनाने रचला आहे. गरीबांच्या मुलांची शाळा विस्थापित करण्याचा प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. जनआंदोलन उभारू.
राजेंद्र बागुल, काँग्रेस नेते.
शाळेच्या जागेवर महापालिका उभारणार विश्रामगृह
नाशिक : हजारो विद्यार्थी घडविणारी एेतिहासिक बी. डी. भालेकर शाळा आता नामशेष होणार आहे. या शाळेच्या जागेवर विश्रामगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दोन दिवसांत शाळेच्या इमारतीचे पाडकाम सुरू केले जाणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली बी. डी. भालेकर शाळा नगरपालिका काळात सुरू झाली होती. कै. भालेकर यांनी दिलेल्या भरीव देणगीतून या शाळेची इमारत उभी राहिली. गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या पाल्यांना या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असे. कला, क्रीडा, सांस्कृतिक विषयात या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्तृत्व गाजवून शाळेच्याच नव्हे तर या शहराच्या लौकीकातही भर घातला. मागासवर्गीय, आदिवासी, बारा बलुतेदारांच्या पाल्यांसाठी ही शाळा म्हणजे खऱ्या अर्थाने 'गुरूकुल' होते. परंतु काही खासगी शिक्षण संस्थांच्या कटकारस्थानांमुळे आणि महापालिकेच्या शिक्षण विभागातील तत्कालिन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची पळवापळवी केली गेली. शिक्षक कमी करणे, शाळा इमारतीची दुरूस्ती न करणे असे संगनमताने प्रकारही घडले. त्यामुळे ही शाळा बंद झाली. आता या शाळेच्या जागेवर विश्रामगृह उभारले जाणार आहे.
बी.डी. भालेकर शाळा इमारत जर्जर बनली असून धोकेदायक घोषित करण्यात आली आहे. सदर इमारत पाडून त्या जागेवर महापालिकेच्या माध्यमातून विश्रामगृहाची उभारणी केली जाणार आहे.
संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका. नाशिक.
विश्रामगृहासाठी तीन कोटींचा निधी
महापालिकेच्या माध्यमातून या विश्रामगृहाची उभारणी केली जाणार आहे. या विश्रामगृह उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मक्तेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. वर्षभरात इमारतीचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.
दोन दिवसांत पाडकाम
विश्रामगृह उभारणीसाठी बी. डी. भालेकर शाळेच्या इमारतीचे दोन दिवसात पाडकाम सुरू केले जाणार आहे. यासाठी मक्तेदाराची नियुक्तीही करण्यात आली असून उद्या कार्यारंभ आदेश दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भालेकर शाळेच्या जागेवर सुरुवातीला बीओटीवर व्यापारी संकुल व त्यानंतर महापालिकेचे पूर्व विभागीय कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव होता.