विधानसभा 2024 pudhari news network
नाशिक

विधानसभा 2024 | नांदगावमध्ये पुन्हा सुहास्य की परिवर्तनाची लहर?

पुढारी वृत्तसेवा
नांदगाव : सचिन बैरागी

गेल्या तीन निवडणूकांपासून भुजबळ कुटुंबियांच्या एन्ट्रीमुळे राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झालेल्या नांदगाव मतदारसंघातील वातावरण तापण्यास प्रारंभ झाला असून महायुतीच्या वतीने विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कोण मैदानात उतरते, याकडे जि्ल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे. गत पाच वर्षांत आ. कांदे यांना केलेल्या कामाची मतदार पावती देतात की मतदारसंघात परिवर्तनाची लहर येते, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. राजकीयदृष्टया कडवे विरोधक असलेले मंत्री छगन भुजबळ हे कांदेंना साथ देतात का, हादेखील महत्वाचा मुद्दा असणार आहे.

नांदगाव मतदारसंघातून माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली आहे. समीर भुजबळ यांनी निवडणूक लढविल्यास कोणत्या पक्षाकडून ते लढणार याकडे सर्वांचे नजरा लागल्या आहेत.

दशकानुदशकांपासून दुष्काळाचा शाप लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात तसा कोणत्याही राजकीय पक्ष वा नेत्याचा सातत्यपूर्ण प्रभाव राहिलेला नाही. कधी कँाग्रेस, कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी कँाग्रेस असा आमदारकीचा लंबक फिरता राहिला आहे. २००९ आणि २०१४ ची निवडणूक बाहुबली नेते छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज यांनी जिंकली. २०१९ मध्ये मात्र एकसंध शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी पंकज यांची हॅट्ट्रिक रोखत विजयश्री नोंदवली. यावेळी मात्र भुजबळ आणि कांदे महायुतीमध्ये असल्याने निवडणूकीत ते एकत्र नांदतील का, हा यक्षप्रश्न आहे. महायुतीकडून सिटींग-गेटींग तत्वानुसार आ. सुहास कांदे निवडणूक रिंगणात राहणार हे निश्चित. गेल्या पाच वर्षांत त्यांनी विविध विकासकामांची पूर्तता करून मतदार संघात स्वपक्षाची चांगली ताकद वाढवली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला नांदगावमध्ये तब्बल ४२ हजारांचे मताधिक्य मिळवून देण्यातून त्यांनी ती बाब सिध्द केली.

माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव मधून उमेदवारी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (आजीत पवार) गटाकडून केली जात आहे. समीर भुजबळांनी नांदगावमध्ये भेटीगाठींसह बैठकांचा धडाका लावल्याने निवडणुकीत ते नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महायुतीला कडवे आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी देखील जोरदार तयारी करत आहे. उध्दवसेनेकडून माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे सुपूत्र गणेश धात्रक जोरदार तयारी सुरु करून मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे आणि मागील निवडणूकीतही चर्चेत राहिलेल्या बाजीराव शिंदे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. पैकी बोरसे यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत तर शिंदे यांनी गत पाच वर्षांपासूनच पेरणी सुरू ठेवली आहे. काँग्रेसकडून माजी आमदार अनिल आहेर यांच्या कन्या तथा माजी जि. प. सदस्य अश्विनी आहेर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. नांदगाव आवाजचे संस्थापक अध्यक्ष भगवान सोनवणे यांनी देखील या निवडणूक रिंगणात उतरण्याची पूर्ण तयारी केल्याचे सांगण्यात येते. मराठा समाजाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना अनेक इच्छुकांनी जरांगे-पाटील यांची भेट घेत आपला बायोडाटा सुपूर्द केला आहे. आम आदमी पार्टीचे विशाल वडघुले, मविप्र संचालक अमित बोरसे, डॉ रोहन बोरसे ही नावेही मतदारसंघात पुढे आली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT