Islam Party Malegaon 
नाशिक

Islam Party Malegaon: दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मालेगावच्या 'इस्लाम' पक्षाची राज्यात वाटचाल; MIM साठी धोक्याची घंटा?

Islam Party Maharashtra | आसिफ शेख यांची राज्यव्यापी विस्ताराची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Islam Party Malegaon Latest News

मालेगाव : मालेगावात स्थानिक राजकारणात निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्बली ऑफ महाराष्ट्र अर्थात इस्लाम पक्ष राज्य पातळीवर आपली राजकीय वाटचाल नेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

महानगरपालिकेतील सत्ता हस्तगत केल्यानंतर पक्ष केवळ शहरापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणी करणार असल्याचा निर्धार पक्षाच्या पहिल्या राज्यस्तरीय संमेलनात व्यक्त करण्यात आला.

अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इस्लाम पक्षाने महानगरपालिका निवडणुकीत तब्बल ३५ जागांवर विजय मिळवित स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलून टाकली. या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचा पराभव करून सत्ता मिळविणे ही इस्लाम पक्षाची मोठी कामगिरी मानली जात आहे.

या यशामुळे इस्लाम पक्ष हा केवळ स्थानिक प्रयोग न राहता, राज्याच्या राजकारणातील संभाव्य घटक म्हणून पाहिला जात आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १५) मालेगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय संमेलनाला राज्याच्या विविध भागांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली होती.

या संमेलनात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण यांसह एकूण १२ जिल्ह्यांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांतील प्रतिनिधींनीही उपस्थिती लावत पक्षाच्या वाढत्या प्रभावाची दखल घेतली. संमेलनात पक्षाची वैचारिक भूमिका, मालेगाव महापालिकेतील सत्तानुभव तसेच आगामी काळातील राजकीय दिशा यावर सविस्तर चर्चा झाली.

महापालिकेतील यशानंतर राज्यभर संघटनेचा विस्तार करावा, असा ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला. इस्लाम पक्षाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मुस्लीमबहुल मतदारसंघांतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विशेषतः दीर्घकाळ मुस्लीम मतदारांवर प्रभाव ठेवणाऱ्या एमआयएमसाठी हा विस्तार अडचणीचा ठरू शकतो, असे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करीत आहेत. मालेगाव विधानसभा निवडणुकीत अवघ्या १६२ मतांनी पराभव पत्करावा लागलेल्या माजी आमदार आसिफ शेख यांनी त्यानंतर महापालिका निवडणुकीत एमआयएमचा पराभव करीत आपली राजकीय पकड अधिक मजबूत केली आहे.

एमआयएमवर धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण केल्याचा आणि भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप शेख सातत्याने करीत आले आहेत. त्याउलट, इस्लाम पक्ष धर्मनिरपेक्ष विचारधारेवर आधारित विकासाचे राजकारण करीत असल्याचा दावा पक्ष नेतृत्वाकडून करण्यात आला.

याचा दाखला देताना मालेगाव महापालिकेतील इस्लाम पक्षाच्या ३५ नगरसेवकांमध्ये तीन हिंदू नगरसेवकांचा समावेश असल्याचे उदाहरण देण्यात आले. राज्यस्तरीय संमेलनानिमित्त पक्षाने राज्यभर विस्ताराचा निर्धार मांडला असून, येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात 'इस्लाम' पक्षाचे अस्तित्व अधिक ठळक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसआयआरसाठी मदत

जन्म दाखले व येणाऱ्या एसआयआरसाठी राज्यातील मुस्लिमांना मदत केली जाईल. यासाठी ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली जातील. राज्यात कुठेही मुस्लिमांना त्रास होत असेल, तर तेथील जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार व पोलिस प्रशासन यांच्याशी बोलण्यासाठी आम्ही येऊ, असेही इस्लाम पक्षाचे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT