

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बाह्य परिक्रमा मार्ग हा शहरासाठी पर्यटनाला चालना देणारा व कनेक्टिव्हिटी वाढविणारा प्रकल्प आहे. हा व्हावा, अशी शासन प्रशासनाची अपेक्षा आहे. मात्र या मार्गासाठी लागणारी जमिनीच्या संपादनाचा प्रश्न सुटता सुटेना, असे चित्र आहे.
प्रशासन मात्र आपल्या कामासाठी सज्ज आहे. मात्र या मार्गासाठी बाधित होणाऱ्या २५ गावांपैकी १३ गावांमध्ये मोजणीला थेट विरोध सुरू आहे. त्यामुळे या गावांमध्ये अद्यापपर्यंत मोजणीला सुरुवात होऊ शकलेली नाही. यंदाचा कुंभमेळ्याला भाविकांची अलोट गर्दी उसळणार असल्याचा अंदाज आहे.
या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी नियोजन सुरू केले आहे. भाविकांची गर्दी वाढल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही कोंडी टाळण्यासह भाविकांची व शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता बाह्य परिक्रमा मार्ग निर्माण करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला.
शहरालगतच्या २५ गावांमधून हा मार्ग जाणार आहे. ६६ किलोमीटरच्या या मार्गाकरिता जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या खासगी जमिनींची आवश्यकता आहे. साधारणतः १ हजार २०० शेतकऱ्यांची ३६५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.
२५ टक्के अधिक मोबदला देण्याची तयारी दर्शवित थेट खरेदीने जमिनी घेण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. परंतु, अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची शेतकऱ्यांची धारणा आहे. 'अलाइन्मेंट' बदलून घरे, विहिरी वाचविण्याची मागणी करीत अनेक गावांमधील भूधारकांनी जमिनी देण्यास विरोध दर्शविला आहे.
येथे होतोय विरोध
देवळाली, आडगाव, विंचूरगवळी, बेळगाव ढगा, वडनेर दुमाला, पिंपळगाव बहुला, विहितगाव, मुंगसरे, महादेवपूर, जलालपूर, गोवर्धन या गावांमध्ये मोजणीला अद्याप सुरुवात होऊ शकलेली नाही.
मखमलाबाद येथे १२ गटांचे मोजणीचे काम अपूर्ण असून सारूळ आणि राजूर बहुल्यात भूमापनाचा ग्रामपंचायतीचा ठराव जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त होऊ शकलेला नाही. भूमी अभिलेख विभागाची यंत्रणा मोजणीसाठी सज्ज लवकर मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून असून, महसूल विभागही लवकरात भूसंपादनाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.
येथे मोजणी पूर्ण
नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील २५ गावांमधून हा रोड जाणार आहे. प्रशासनाने समजूत काढत काही गावांमधील शेतकऱ्यांचे मन परिवर्तन केले. त्या शेतकऱ्यांकडून प्रशासनाला सहकार्य मिळत आहे.
त्यात ढकांबे, मानोरी, वरवंडी, माडसांगवी, पाथर्डी, पिंपळगाव खांब, पंचक, आंबे बहुला आणि गौळाणे येथील संभाव्य बाधित शेतकऱ्यांनी जमीन मोजणीकामी सहकार्य केले आहे. माडसांगवीतील सर्वाधिक ८७, पाथर्डी गावातील ३३, गौळाणेतील २३, ढकांबे येथील १९, तर पंचक येथील १६ गटांच्या मोजणीचे काम महसूल यंत्रणेने पूर्ण केले आहे.