नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अशोक खरात याचे अनेक कारनामे समोर येत असून, त्याने अंनिस कार्यकर्त्यांना देखील धमक्या दिल्याची बाब समोर येत आहे. अंनिसचे कार्यकर्ते २००७ पासून खरातच्या मागावर होते. त्यावेळी खरातने त्यांना बंदुकीची धमकी दाखविल्याची माहिती अंनिसने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
अंनिसने दिलेल्या माहितीनुसार, २००७ साली अंनिसकडे एका पत्रकाराने खरातची फोनद्वारे तक्रार केली होती. त्यानुसार अंनिसचे कार्यकर्ते महेंद्र दातरंगे व प्रा. डॉ. सुदेश घोडेराव हे खरातच्या कार्यालयात गेले होते. तो करत असलेले कृत्य हे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असल्याची जाणीव अंनिस कार्यकर्त्यांनी त्याला तेव्हा करून दिली होती.
त्यावर त्याने, 'मी निवृत्त कॅप्टन आहे, माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे', अशी धमकी कार्यकर्त्यांना दिली होती. मात्र, कार्यकर्त्यांनी त्याच्या धमकीला न घाबरता, त्याला आव्हान दिले होते. मात्र, त्याने 'सावध राहा' अशा शब्दांत कार्यकर्त्यांना धमकावले होते.
अंनिस या कार्यकर्त्यांच्या या निर्भिडपणामुळे खरातने तब्बल तीन महिने आपले दुकान बंद ठेवले होते. मात्र, त्याने पुन्हा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार सुरू केले. २०१३ मध्ये अंनिसचे सिन्नर येथील कार्यकर्ते अरुण घोडेराव यांच्याशी ईशान्येश्वर मंदिराच्या एका ट्रस्टीने वाद घालून धमकी दिली होती.
२०२२ मध्ये जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीला आले होते, त्यावेळी त्यांनी प्रोटोकॉल तोडून मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात खरातची भेट घेतली होती. त्यावेळी का ट्रस्टीने चांदगुडे यांच्यावर दबाव आणला असल्याचे अंनिसने स्पष्ट केले आहे.
आम्हाला कायमच अनेक धमक्या येत असतात. पण आम्ही विवेकवादी कार्यकर्ते असल्याने कधीच तक्रार दाखल करत नाही. डॉ. दाभोळकरांची आम्हाला शिकवण होती. ते शहीद झाल्याने आम्ही मारण्याच्या भीतीवर विजय मिळवला आहे.- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस