Ashok Kharat SIT Investigation: नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. सध्या अटकेत असलेल्या अशोक खरातचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे धक्कादायक खुलासे होत आहेत. आतापर्यंत खरातवर राज्यभरात १४ गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक फॉरेन्सिक खुलासे झाले आहेत. SIT कडे खरातच्या काळ्या कारनाम्यांचे जवळपास १६० जीबी डिजीटल पुरावे सादर करण्यात आले आहेत. अमेरिकेचा एपस्टीन ज्या प्रकारे आपल्या गुन्ह्यांचा डिजीटल डेटा गोळा करून ठेवायचा तसाच काहीसा प्रकार खरातच्या बाबतीत देखील होताना दिसत आहे.
हा डिजीटल डेटा लॅपटॉप, पेनड्राईव्हसह अनेक स्टोअरेज डिव्हाईसमध्ये ठेवण्यात आला होता. ही सर्व उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. खरातबाबतचे हे डिजीटल पुरावे A,B,C कोडनेमने वर्गीकृत करण्यात आले आहेत. एसआयटीच्या तपासात खरात प्रकरणात लैंगिक अत्याचाराचे गंभीर पुरावे आढळल्याची माहिती मिळत आहे.
खरातकडे अनेक महिलांची नावे आणि भेटीच्या नोंदी सापडल्या आहेत. आता हे सर्व डिजीटल पुरावे न्यायालयात सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खरात प्रकरणामुळं फक्त नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अशोक खरातसोबत राज्यातील अनेक बड्या राजकारण्यांचे फोटो झळकल्यामुळं या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झालं आहे. तसेच प्रशासनातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा देखील यात समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता अशोक खरात प्रकरण फक्त भोंदूगिरी अन् लैंगिक अत्याचारापर्यंत मर्यादित न राहता मनी लाँड्रिंग, पैशाचा अपहार अन् फसवणूक या सर्व गुन्ह्यांचे देखील अँगल या प्रकरणाला जोडले गेले आहेत.