Ashok Kharat court statement
नाशिक : "माझ्याकडे आलेले पैसे मी समता पतसंस्थेच्या मॅनेजरला दाखवले होते. ही सहकारी बँक असून येथे ९ टक्के व्याज मिळते, असे सांगून त्यांनीच मला हे पैसे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मी ते पैसे ठेवले; पण मला सगळ्या अकाउंटला नॉमिनी का करण्यात आले, याबद्दल मला काहीही माहिती नाही. आता तपास झालाय. मी आणि आवारे जेलमध्ये आहोत, एवढंच मला माहिती आहे," अशी कबुली भोंदू अशोक खरात याने आज (दि. २० मे) न्यायालयात दिली.
समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार आणि खात्यांमधील कथित संशयास्पद रकमेप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीशांनी "तुमच्यावर नेमके काय आरोप ठेवण्यात आले आहेत, हे तुम्हाला समजतंय का?" या प्रश्नानंतर खरात याने न्यायालयात आपली बाजू मांडली.
खरातने न्यायालयात सांगितले की, "माझ्याकडे जी रक्कम आली होती, त्याबद्दल मी स्वतः समता पतसंस्थेच्या मॅनेजरला माहिती दिली होती. माझ्याकडे असे पैसे आहेत. त्यावर मॅनेजरने ही एक सहकारी बँक असून येथे ९ टक्के इतके चांगले व्याज मिळते, असे सांगून मला पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. हे पैसे एकाच ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या खात्यांमध्ये (अकाउंट्स) ठेवण्यास त्यांनीच मला सांगितले होते आणि त्यानुसारच मी ती रक्कम बँकेत ठेवली होती."
"जर सर्व काही नियमानुसार होते, तर तुम्हाला या सगळ्या अकाउंटला 'नॉमिनी' (वारसदार) करण्याचे कारण काय होते?" या प्रश्नावर खरात म्हणाला. त्याबद्दल मला खरोखर काहीही माहिती नाही. या प्रकरणाचा तपास झाला. आता मी आणि आवारे जेलमध्ये आहोत, यापलीकडे मला काहीही माहीत नाही."