Ashok Kharat Nashik Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case Nashik | हायटेक भोंदूगिरी! अशोक खरातकडून मोबाईल ॲप आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे भक्तांची फसवणूक

Ashok Kharat Case Nashik | यंत्र, अॅप आणि बनावट विधींनी भक्तांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात प्रकरणातील तपासात आणखी एक धक्कादायक पैलू समोर आला असून, धार्मिक विधींच्या नावाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भक्तांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, विधी करताना काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक यंत्रे आणि मोबाइल अॅपचा वापर करत कृत्रिम आवाज निर्माण केले जात होते.

त्या आवाजांवरून भक्तांच्या 'दोषांचे' विश्लेषण केल्याचे भासवले जात होते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विधी सुरू असताना या यंत्रांमधून किंवा अॅपमधून वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र आवाज येत असत.

त्या प्रत्येक आवाजाला वेगवेगळा अर्थ देत खरात भक्तांना भ्रमित करत असे. एखादा विशिष्ट आवाज आला तर दोष कमी आहे, दुसरा आवाज आला तर दोष गंभीर आहे, तर तिसऱ्या प्रकारच्या आवाजावर मागील जन्मातील कारणे आहेत, असे सांगून तो समोरच्याच्या मनात भीती निर्माण करत असे.

या पद्धतीमुळे भक्तांमध्ये त्याच्याविषयी अंध विश्वास निर्माण होत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याशिवाय, खरातने वापरलेली काही घृणास्पद पद्धतीही समोर आल्या आहेत. तो नारळाच्या पाण्यात स्वतःची लघवी मिसळून ते भक्तांना वास घेण्यासाठी देत असे.

त्याचबरोबर दुसऱ्या भांड्यात रंगमिश्रित साधे पाणी ठेवले जाई. या दोन्हीपैकी ज्या पाण्याचा वास वेगळा वाटेल, त्यावरून दोषाची तीव्रता असल्याचे तो सांगत असे. या प्रकारामुळे समोरच्याला मानसिकदृष्ट्या गोंधळात टाकून त्याच्यावर नियंत्रण मिळवले जात असल्याचे उघड झाले आहे.

सर्व पद्धतींचा उद्देश एकच

भक्तांचा विश्वास प्राप्त करत त्यांना पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली ठेवणे. विशेष म्हणजे, उच्चभ्रू कुटुंबांतील महिला व व्यक्तीही या बनावट विधींना बळी पडत असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणातील तपास सध्या वेगाने सुरू असून, अशा प्रकारच्या तांत्रिक फसवणुकीमागील यंत्रणा आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या नव्या खुलाशांमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे. भोंदूगिरीच्या या आधुनिक रूपामुळे समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT