नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील भोंदूगिरीच्या माध्यमातून अनेकांना जाळ्यात ओढणाऱ्या अशोक खरातच्या कुकर्माची नवी पंचसूत्री समोर आली आहे. महिलांचे मानसिक आणि शारीरिक शोषण करण्यासाठी त्याने सुनियोजित पद्धतीचा वापर केल्याचे तपासातून उघड झाले आहे. त्याच्या कार्यालयातील 'झुंबर' हा कोडवर्ड असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
महिलेला आत नेल्यानंतर झुंबरचा लाइट बंद करणे म्हणजे आत कोणालाही प्रवेश नाही, असा संकेत कर्मचाऱ्यांना दिला जात होता. शहरात भोंदूगिरी करत लोकांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरातच्या गुन्ह्यांचे धागेदोरे आता अधिक गंभीर स्वरूपात समोर येत आहेत.
तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो एका ठराविक 'पंचसूत्री'चा वापर करत होता. या पद्धतीमुळे सामान्य नागरिकांसह सुशिक्षित व्यक्तीही त्याच्या प्रभावाखाली येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरात सुरुवातीला त्याच्याकडे येणाऱ्या व्यक्तींची जन्मतारीख विचारून त्यांचा जन्मवार अचूक सांगायचा. यामुळे तो अत्यंत ज्ञानी असल्याचा आभास निर्माण होत असे.
त्यानंतर तो विशेषतः महिलांची सहानुभूती मिळवण्यावर भर देत असे. पती-पत्नी एकत्र आल्यास त्यांच्या वैवाहिक आयुष्यात संशय निर्माण करून वाद निर्माण करणे ही त्याची पुढील पायरी होती. तपासात असेही उघड झाले आहे की, काही प्रकरणांमध्ये तो कुटुंबातील सदस्यांमध्ये अविश्वास निर्माण करत असे. 'अपत्यासाठी पती जबाबदार आहे' किंवा 'एका मुलावर वडिलांचा हक्क नाही' अशा खोट्या दाव्यांमुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले.
या परिस्थितीचा फायदा घेत तो महिलांना आधार देण्याच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे. याशिवाय, अंकशास्त्राचा आधार घेत प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळखी करून देणे, त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकणे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवणे अशा प्रकारचे व्यवहारही समोर आले आहेत.
मालमत्ता व्यवहारातही त्याने फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. दरम्यान, त्याच्या कार्यालयातील 'झुंबर' हा कोडवर्ड असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. महिलेला आत नेल्यानंतर झुंबरचा लाइट बंद करणे म्हणजे आत कोणालाही प्रवेश नाही, असा संकेत कर्मचाऱ्यांना दिला जात होता. या सर्व प्रकारामुळे खरातच्या गुन्हेगारी पद्धतीची भीषणता समोर आली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.