

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरातच्या विरोधातील महिला लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळत असून, फॉरेन्सिक टीम व विशेष तपास पथकाने (एसआयटी) सलग तिसऱ्या दिवशी कॅनडा कॉर्नर येथील 'ओक्स प्रॉपर्टी' या त्यांच्या कार्यालयातील झाडाझडती सुरूच होती.
या कारवाईदरम्यान विशेष म्हणजे तपासाच्या अनुषंगाने काही पीडित महिलांनाही या ठिकाणी बोलवण्यात आले होते, त्यामुळे या कारवाईला अधिक महत्त्व आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ च्या सुमारास एसआयटी आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक संबंधित कार्यालयात दाखल झाले.
जवळपास ४० मिनिटे सुरू असलेल्या या तपासणीदरम्यान कार्यालयातील विविध कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच इतर संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यात आली. यावेळी अनेक महत्त्वाचे नमुने गोळा करण्यात आले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशोक खरातवर महिला लैंगिक शोषण तसेच फसवणुकीचे गंभीर आरोप असून, या प्रकरणाने राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
विविध भागांतून पीडित महिलांनी पुढे येत तक्रारी नोंदवल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. खरातच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास व्हावा यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे या पथकाची जबाबदारी सोपविण्यात आलेली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. सुरुवातीला हिमांशू बंगल्यातून तपास सुरू करण्यात आला होता, मात्र तपासाची गोपनीयता राखण्यासाठी नंतर एसआयटीचे कार्यालय महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे स्थलांतरित करण्यात आले.
सध्या अशोक खरात एसआयटीच्या ताब्यात असून, न्यायालयाने त्याला रविवार (दि. २९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत त्याच्याकडून अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आतापर्यंत खरातच्या विरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे एकूण ८ गुन्हे दाखल झाले असून, पुढील काही दिवसांत आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक स्वरूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत.