भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक बाबी सातत्याने समोर येत असून, महिलांच्या लैंगिक व मानसिक शोषणाचा हा प्रकार केवळ अलीकडचा नसून तब्बल १५ ते २० वर्षांपासून सुरू असल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे. घरगुती अडचणी, वैवाहिक तणाव आणि आरोग्य समस्यांवर उपाय देण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढत हा प्रकार दीर्घकाळ चालू ठेवण्यात आला असल्याचे स्पष्ट होत आहे.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या काळात शेकडो महिलांची फसवणूक व शोषण झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अनेक महिला भीती, सामाजिक दबाव आणि बदनामीच्या धास्तीमुळे पुढे येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष तक्रारींचा आकडा कमी असला तरी, पीडितांचा वास्तविक आकडा मोठा असल्याचे संकेत मिळत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित महिलांची संख्या ५००च्या पुढे गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून आता अधिकाधिक महिलांना पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात येत असून, या प्रकरणाचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे समाजातील अंधश्रद्धा आणि भीतीचा कसा गैरफायदा घेतला जातो, याचेही भीषण चित्र समोर येत आहे.
फसवणुकीपलीकडे शासनालाही चुना; आर्थिक व्यवहारांवर आयकर-जीएसटीची नजर
भोंदू अशोक खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण या गंभीर आरोपांबरोबरच आता त्याने शासनाचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. खरातने आपल्या तथाकथित आध्यात्मिक कार्याच्या आडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचा संशय असून, या व्यवहारांमध्ये करचुकवेगिरी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्याच्या नावावर तसेच बेनामी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता उभारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता आयकर विभाग आणि जीएसटी विभागही सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची, बँक खात्यांची, गुंतवणुकीची तसेच मालमत्तेची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे समजते. या तपासातून आणखी मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.