Pratibha Chakankar Pudhari
नाशिक

Shirdi Fraud Case | नाशिकच्या भोंदूबाबाचे 'ईडी' कनेक्शन! प्रतिभा चाकणकरांची चौकशी; 2 कोटींच्या संशयास्पद व्यवहारांचा पेच

Shirdi Fraud Case | खरातच्या बनावट खात्यांतून कोटींची उलाढाल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात तपास अधिक वेगाने पुढे सरकत असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले होते. त्यानुसार त्या सोमवारी (दि. ४) ईडी कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोऱ्या गेल्या. या चौकशीमुळे खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. तपासादरम्यान खरातने १३४ हून अधिक प्रॉक्सी (बनावट) खाती चालवल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर चार बँक खाती असून, त्यातून गेल्या काही वर्षांत सुमारे दोन कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

प्राथमिक चौकशीत हे व्यवहार खरातशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या खुलाशामुळे या प्रकरणात आणखी खळबळ उडाली आहे. १ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात अनेक वेळा संपर्क झाल्याचे समोर आले आहे.

त्यात मेसेजेसचा समावेश असून, त्यांच्या मुलगा तन्मय चाकणकर याचेही खरातशी दूरध्वनीवर संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंध नाही असा दावा करणाऱ्या चाकणकर कुटुंबीयांची अडचण वाढल्याचे मानले जात आहे. यापूर्वी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलाची सुमारे आठ तास चौकशी केली होती. त्या वेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळले होते.

मात्र, आर्थिक व्यवहारांचा मोठा व्याप आणि संशयास्पद देवाण-घेवाण लक्षात घेता आता ईडीने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या चौकशीत पैशांचा स्रोत, व्यवहारांची साखळी आणि अशोक खरातशी असलेले कथित आर्थिक संबंध याबाबत प्रतिभा चाकणकर कोणते स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिर्डी पोलिसांनी घेतला भोंदू खरातचा ताबा

भोंद अशोक खरातला नवव्या गुन्ह्यात न्यायालयाने दि. १६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असली, तरी शिर्डी पोलिसांनी त्याला आवश्यक असलेल्या दोन गुन्ह्यांच्या तपासासाठी नाशिकरोड कारागृहातून तत्काळ ताब्यात घेतले आहे. त्यामुळे खरात आणखी काही काळ शिर्डी पोलिसांच्या ताब्यात राहणार खयात आणखी काही काळ शिर्डी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिर्डी येथे भूखंड बळकावणे तसेच समता नागरी सहकारी पतसंस्थेतील बनावट खात्यांद्वारे आर्थिक गैरव्यवहार या दोन गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी खरातची उपस्थिती आवश्यक होती. त्यानुसार सोमवारी (दि. ४) सकाळी शिर्डी पोलिस पथकाने जिल्हा न्यायालयात हजर राहन खरातचा ताबा मिळवला. उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी निवांतराजे जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खरातला नाशिकरोड कारागृहातून शिर्डीकडे रवाना केले. यावेळी न्यायालयात न्यायाधीश इचमपुरे यांनी आदेश देताना तपासाच्या दृष्टीने आरोपीचा ताबा शिर्डी पोलिसांकडे देण्यास मंजुरी दिली.

सुनावणीदरम्यान एसआयटीचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती, पोलिस उपनिरीक्षक निवांतराजे जाधव, सहायक संचालक कल्पना बेंडभर तसेच सरकारी वकील अॅड. शैलेंद्र बागडे उपस्थित होते. अशोक खरात हा दि. १८ मार्चपासून विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात असून, त्याच्याविरुद्ध आतापर्यंत नाशिक, पुणे, ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मिळून १६ गुन्हे दाखल झाले आहेत.

त्यामुळे विविध जिल्ह्यांच्या पोलिसांकडून त्याचा ताबा घेऊन तपास सुरू ठेवला जाणार असल्याने त्याला पुढील काही काळ पोलिस कोठडीतच राहावे लागणार आहे. याशिवाय, शिर्डीतील भूखंड बळकावण्याच्या प्रकरणात खरातची पत्नी अद्याप फरार असून, तिचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT