नाशिक : निखिल रोकडे
भोंदू अशोक खरात प्रकरणातील पीडित महिला आणि त्यांचे कुटुंबीय सध्या सामाजिक, मानसिक संकटातून जात आहे. या प्रकरणातील व्हायरल व्हिडिओंमुळे संबंधित महिलांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले असून, समाजाकडून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात बदलल्याचे चित्र दिसत आहे.
परिसरात तसेच नातेवाइकांमध्ये या प्रकरणाची चर्चा होत असली तरी ती चर्चा मर्यादित न राहता गॉसिपच्या स्वरूपात अधिक पसरत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झालेल्या काही महिला या नोकरी करणाऱ्या असून, काही जणी उच्चपदांवर कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनेनंतर संबंधित महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काही ठिकाणी त्यांना थेट कामावरून कमी न करता 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे मौखिक निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या नोकरीचे भवितव्य सध्या अधांतरी असल्याचे दिसते. कामाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे महिलांवर मानसिक ताण वाढला असून, त्याचा परिणाम त्यांच्या व्यावसायिक व कौटुंबीक जीवनावर होत आहे. तसेच काहींचे कायम बरोबर असलेले कुटुंब सध्या दुरावत चालले आहे. दुसरीकडे, समाजात या प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही चिंताजनक असल्याचे दिसते.
पीडित महिलांना सहानुभूती देण्याऐवजी त्यांच्याबाबत कुजबूज आणि चर्चांना अधिक वाव मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही सामाजिक स्तरावर मोठा दबाव सहन करावा लागत आहे. काही कुटुंबांनी तर सामाजिक कार्यक्रमांना जाणे टाळल्याची माहिती समोर आली आहे, तर काहींनी स्वतःला समाजापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) तसेच पोलिस यंत्रणेकडून सुरू असून, आरोपी अशोक खरात आणि त्याला मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. मात्र, ही कारवाई प्रामुख्याने आरोपी व त्याच्या जाळ्यापुरती मर्यादित असल्याचे दिसते. पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी किंवा त्यांना सामाजिक स्तरावर आधार देण्यासाठी ठोस उपाययोजना अद्याप दिसून येत नाहीत. या पार्श्वभूमीवर, पीडित महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेचे पुनर्स्थापन कोण करणार, त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक आयुष्यावर झालेल्या परिणामांची भरपाई कशी होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कायदेशीर कारवाईसोबतच समाजाने संवेदनशील भूमिका घेत पीडितांना आधार देणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा या प्रकरणाचे दूरगामी परिणाम संबंधित कुटुंबांच्या आयुष्यावर दीर्घकाळ उमटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याची गरज
या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर अतिशय वेगाने व्हायरल झाले. वेबसाइटच्या माध्यमातून प्रसारित झालेले अनेक व्हिडिओ पोलिस यंत्रणेच्या कारवाईनंतर हटविण्यात आले असले तरी व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर ते अद्यापही फिरत असल्याचे आढळते. त्यामुळे संबंधित महिलांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहे. पोलिस प्रशासनाकडून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई सुरू असली तरी नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याची गरज अधोरेखित होत आहे. कोणताही व्हिडिओ पुढे पाठवण्यापूर्वी त्याचे परिणाम लक्षात घेणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.