

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
दरगोडे कुटुंबाची सकाळ म्हणजे चिमुकल्यांचा किलबिलाट... इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एक-दोन नाही, तर तीन पिढ्यांपासून एकत्र राहतात. मात्र, या भरल्या घराला कुणाची तरी नजर लागली अन् शनिवारच्या सकाळी अंगणात चिमुकल्यांसह नऊ जणांचे मृतदेह पाहून संपूर्ण गाव निःशब्द झाला. दिंडोरी येथील कार अपघातात मृत झालेल्या दरगोडे कुटुंबातील नऊ जणांना शनिवारी एकाचवेळी अग्निडाग देण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव सुत्र झाला होता.
दिंडोरी येथील खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना शुक्रवारी (दि.३) रात्री १० वाजता विहिरीत कार कोसळून झालेल्या अपघातात इंदोरे येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. यात सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इंदोरे येथील दरगोडे कुटुंब घरी परतत असताना शिवाजीनगर येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत त्यांची कार कोसळली.
यात सुनील दत्तू दरगोडे (३५), रेश्मा सुनील दरगोडे (३३), आशा अनिल दरगोडे (३२), सृष्टी अनिल दरगोडे (१३), श्रेयस अनिल दरगोडे (११), श्रद्धा अनिल दरगोडे (१२), श्रावणी अनिल दरगोडे (११), गुणवंती सुनील दरगोडे (११), समृद्धी राजेंद्र दरगोडे (१३) यांचा समावेश आहे. रात्री घटना घडल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण झाला होता.
आपत्ती व्यवस्थापन पथक आल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये सात जणांचे मृतदेह होते. गाडीची काच फुटल्याने दोन जण विहिरीत पडले. आपत्ती व्यवस्थापनाने विहिरीत उतरून हे मृतदेह बाहेर काढले. शनिवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, अन्न औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. ही विहीर बुजवण्याच्या सूचना दिल्यानुसार प्रशासनातर्फे विहीर बुजवण्यात आली.
मृतांच्या नातेवाइकांना देणार पाच लाखांची मदत : मंत्री गिरीष महाजन
अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ही मदत जाहीर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री महाजन, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री दादा भुसे, खा. भास्कर भगरे, रामदास चारोस्कर, धनराज महाले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
तसेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. यावेळी मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना ज्या विहिरीत कार कोसळली, त्या विहिरीला कठडा नव्हता. त्यामुळे विहीरमालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित विहीर तातडीने बुजवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. तसेच धोकेदायक विहिरींचा सव्हें करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.