नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरात याच्या विरोधातील महिला लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र होत असून, फॉरेन्सिक टीम व विशेष तपास पथकाने (एसआयटी) कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टी या त्याच्या कार्यालयात धाड टाकून सखोल झाडाझडती घेतली.
या कारवाईदरम्यान फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही उपस्थित होते. विशेष म्हणजे, तपासाच्या अनुषंगाने काही पीडित महिलांनाही या ठिकाणी बोलाविण्यात अले होते, भोंदू प्रकरणाची व्याप्ती बघता एकंदरीत १,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक फसवणूक व मालमत्ता असल्याचे निष्पन्न होत आहे.
या प्रकरणाचा तपास ईडीकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सकाळी ११ च्या सुमारास तपास पथके दाखल झाले. दीड तास तपासणी सुरू होती. तपासणीदरम्यान विविध कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यात आली.
यावेळी अनेक नमुने गोळा करण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर तपासाला अधिक गती मिळेल. या कारवाईवेळी उपविभागीय अधिकारी किरण सूर्यवंशी, किरण सोनवणे, पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.