नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा पैलू समोर आला असून, तपासात तब्बल ७० कोटी रुपयांचे रोख व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. कायद्यानुसार रोख व्यवहारांवर मर्यादा असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार केल्याने तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.
तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, खरातने या रोख व्यवहारांच्या माध्यमातून नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केली आहे. या व्यवहारांत अधिकृत कागदपत्रांचा अभाव असल्याने पैशांचा स्रोत शोधणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
विशेष म्हणजे, गोविंदनगर परिसरातील कर्मयोगीनगर येथील 'तृप्ताबाला' बंगल्याचे काम तसेच कॅनडा कॉर्नर परिसरातील 'फोकस प्रॉपर्टी'च्या इंटेरियरसाठीही खरातने मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम खर्च केल्याचे समोर आले आहे. या कामांसाठी संबंधित कामगारांना सुमारे २५ लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
रोख स्वरूपात व्यवहार केल्यामुळे या पैशांचा मूळ स्रोत शोधणे अधिक कठीण बनले आहे. बँकिंग व्यवहाराऐवजी कॅशचा वापर करून व्यवहार केल्याने तपासात अडथळे निर्माण होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
भोंदू अशोक खरातला महिला लैंगिक शोषण प्रकरणी १८ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हा प्राथमिक स्वरूपात हे प्रकरण महिला शोषण इतकेच दिसत होते. मात्र, जसजसा तपास पुढे गेला, त्यामधून धक्कादायक माहिती उघडकीस आली. सर्व प्रकारच्या यंत्रणेला हाताशी धरून खरात १५०० कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता कमवली आहे.
यामध्ये सर्वाधिक मालमत्ता ही रिअल इस्टेटच्या माध्यमातून कमवली आहे. दरम्यान, या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा तसेच एसआयटीकडून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली असून हवाला व्यवहार, बेकायदेशीर संपत्ती आणि इतर आर्थिक घडामोडींचाही तपास सुरू आहे. खरातच्या या 'कॅश गेम'मुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, पुढील तपासातून आणखी मोठे आर्थिक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.