Sanskrit and Artificial Intelligence  pudhari photo
नाशिक

Sanskrit and Artificial Intelligence | प्राचीन संस्कृतला आधुनिक 'एआय'ची जोड

Sanskrit and Artificial Intelligence | प्राचीन संस्कृतला आधुनिक 'एआय'ची जोड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

भारताची प्राचीन ज्ञानसंपदा विशेषतः संस्कृत व्याकरण, न्यायशास्त्र, तत्त्वज्ञान आणि भाषाविज्ञान यांना आधुनिक युगातील सर्वात प्रभावशाली एआय या तंत्रज्ञानाशी जोडण्याचा देशातील पहिला प्रयोग नाशिकमध्ये केला जात आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने त्यांच्या नाशिक कॅम्पसमध्ये बी. टेक. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅण्ड डेटा सायन्स हा चार वर्षांचा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमा अंतर्गत पाणिनीय व्याकरणाची संरचनात्मक अचूकता आणि तार्किक प्रणाली ही आधुनिक संगणक कोडिंग, अल्गोरिदम आणि मशीन लर्निंगच्या सिद्धांतांनुसार अवगत केली जाणार आहे. वेदांचेही धडे एआयद्वारे गिरविले जाणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सुरू होणारा हा अभ्यासक्रम देशातील कोणत्याही संस्कृत विद्यापीठात प्रथमच सुरू होत आहे. भारतीय ज्ञानपरंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवणारा हा उपक्रम मानला जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या बहुविद्याशाखीय शिक्षणाच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स यांसारख्या अत्याधुनिक विषयांमध्ये प्रावीण्य मिळवून देणारा आहे.

संस्कृत व्याकरण, भाषाविज्ञान, न्यायशास्त्र आणि तत्त्वज्ञानातील तर्कशुद्ध संरचना, आधुनिक संगणक कोडिंग, अल्गोरिदम आणि मशीन लर्निंगच्या तत्त्वांशी जोडण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमातून केला जाणार आहे. या अभ्यासक्रमाद्वारे एआय-आधारित संस्कृत अनुवाद प्रणाली, प्राचीन ग्रंथांमधून ज्ञान निष्कर्षण, दुर्मीळ हस्तलिखितांचे डिजिटल संवर्धन आणि त्यांचे अर्थवैज्ञानिक विश्लेषण यासारख्या संशोधन क्षेत्रांना चालना दिली जाणार आहे. त्यामुळे भारतीय भाषांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमाद्वारे होऊ शकणार आहे. त्यामुळे नाशिक आता केवळ संस्कृत शिक्षणाचे नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स संशोधनाचेही महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येण्याची चिन्हे आहेत.

जेईई गुणांच्या आधारे प्रवेश

एआयसीटीईच्या मंजुरीनुसार नाशिक कॅम्पसमध्ये प्रारंभी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अतिरिक्त १० टक्के जागांचीही तरतूद करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया जेईई गुणांच्या आधारे होणार असून, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.

विश्वगुरू भारत संकल्पनेला बळ

या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ कोडिंग आणि डेटा अॅनालिटिक्स शिकणार नाहीत, तर संस्कृतच्या आधारावर नैतिक मूल्याधारित आणि मानवी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी संशोधन करतील. यामुळे विश्वगुरू भारत या संकल्पनेलादेखील गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल सुविधा आणि तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती केली जात आहे. विद्यार्थ्यांना उद्योगकेंद्रित प्रशिक्षण, संशोधन प्रकल्प आणि नवोपक्रम कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. याशिवाय विद्यार्थ्यांना एआयसीटीईच्या प्रगती, सक्षम, स्वानाथ शिष्यवृत्ती योजना तसेच स्मार्ट इंडिया हॅकाथॉन सारख्या राष्ट्रीय नवोपक्रमांचा लाभ मिळेल.

- नीलाभ तिवारी, संचालक, नाशिक कॅम्पस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT