

Deola Taluka Gram Panchayat Election Reservation Draw
देवळा : तालुक्यातील मुदत संपलेल्या १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सदस्यपदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने शुक्रवार, दि. १२ जून रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
सन २०२४, २०२५ आणि २०२६ या कालावधीत उमराणे, महात्मा फुलेनगर, तिसगाव, सांगवी, वऱ्हाळे, कुंभार्डे, खालप, गिरणारे, लोहोनेर, महालपाटणे, देवपूरपाडे, निंबोळा आणि वरवंडी या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रशासनाने सदस्यांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित केला असून, त्यासाठी विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
या प्रक्रियेसाठी विस्तार अधिकारी देवीप्रसाद मांडवडे, प्रवीण संधान, सचिन थैल, सहाय्यक महसूल अधिकारी एम. के. गांगुर्डे, संदीप जाधव, मंडळ कृषी अधिकारी निवृत्ती आहेर तसेच मंडळ अधिकारी सुवर्णा थेटे आणि के. टी. ठाकरे यांची अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, मुदत संपलेल्या काही ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्याने इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता या सोडतीकडे लागले आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, त्यामुळे संबंधित गावांतील राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे चित्र आहे.