नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८) विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. गुरुवारी (दि. २९) अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ग्रामीण महाराष्ट्राशी त्यांची नाळ जोडलेली होती. अजितदादांची संवेदनशीलता अन् कार्यतत्परतेची प्रचिती नाशिक जिल्ह्यालादेखील आली आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे परिसरातील वाड्या वस्त्या, दादांच्या आदेशामुळे या वाड्या वस्त्यांवर वीज पोहोचली.
याबाबत माहिती अशी की, जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे परिसरातील वाड्या वस्त्यांवर २०१५ पर्यंत रात्री कधीच वीज नसते. पिंपळस येथील श्रीराज मत्सागर हा इयत्ता चौथीत शिकत असताना, रात्री रॉकेलच्या दिव्यावर आईसोबत अभ्यास करत असे. दिव्याच्या धुरामुळे त्याचे डोळे आणि तोंड काळे होत असे.
याच परिस्थितीतून एक दिवस त्याने वडील सोमनाथ मत्सागर यांना, 'पप्पा, आपल्याकडे रात्री कधीच लाइट येणार नाही का?' असे विचारले होते. मुलाचा हा प्रश्न मनाला चटका लावणारा होता. यावर सोमनाथ मत्सागर यांनी हा प्रश्न थेट राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री अजितदादा पवार यांनाच विचारायचा निश्चय केला. त्यांनी दादांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर संपर्क साधण्यास सुरुवात केली. सलग तीन दिवसांच्या पाठपुराव्यानंतर अखेर तिसऱ्या दिवशी सायंकाळी त्यांचा अजितदादांशी संपर्क झाला. त्यांनी संपूर्ण परिस्थिती सांगत मुलाने विचारलेला तोच प्रश्न दादांसमोर मांडला.
दादांनी क्षणाचाही विलंब न लावता गावाचे नाव, पूर्ण पत्ता आणि जिल्ह्याची माहिती विचारली आणि फोन ठेवला. दुसऱ्याच दिवशी नाशिक विभागातील वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन सोमनाथ मत्सागर यांना आला. दुपारी वीज मंडळाचे पाच ते सहा वरिष्ठ अधिकारी थेट पिंपळस रामाचे येथील कार्यालयात हजर झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि तत्काळ हालचाली सुरू झाल्या.
थेट बारामतीहून आवश्यक साहित्य मागवण्यात आले आणि उत्तर महाराष्ट्रातील सबस्टेशनमधून वाड्या वस्त्यांसाठी सिंगल फेज वीजपुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात आला. अजितदादांना फोन केल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांत पिंपळस गावातील वाड्या-वस्त्यांवर वीज पोहोचली अन् वाड्या-वस्त्या उजळल्या.