सिडको ( नाशिक ) : अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे आयोजित चार दिवसांच्या आयमा इंडेक्स- २०२५ या विराट औद्योगिक कुंभाला गेल्या तीन दिवसांत ५० हजारांहून अधिक व्यक्तींनी भेट दिली. या प्रतिसादामुळे आयोजकांना सुखद धक्का बसला आहे. अभूतपूर्व प्रतिसाद आणि नाशिकला गुंतवणुकीचा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला ओघ हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
प्रदर्शनात ३७५ हून अधिक उद्योजकांनी सहभाग नोंदविला. बी टू बी अंतर्गतच्या बैठका,खरेदीदार आणि वेंडर्स यांच्यात प्रत्यक्ष घडवून आणलेली चर्चा तसेच या प्रदर्शनामुळे येत्या काही दिवसात कोट्यवधीची गुंतवणूक नाशकात येणार आहे. विविध विषयांवरील परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रदर्शनाची रंगत अधिकच वाढली होती. प्रदर्शनाच्या मुख्य प्रायोजकांपैकी एक असलेल्या एचएएलच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी नाशिकच्या उद्योजकांचे पाठबळ लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केल्याने नाशिकच्या उद्योजकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आयमाने नाशिकला औद्योगिक क्षेत्रात विविध उंचीवर नेऊन ठेवल्याचे सांगताना आयमाचे विद्यमान अध्यक्ष ललित बूब आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.
कनेक्ट, कोलॉब्रेट अँड क्रिएट ही थीम घेऊन भरविण्यात आलेल्या या औद्योगिक प्रदर्शनात अभियांत्रिकी, मशीन टूल्स, मेकॅट्रॉनिक्स,ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक उपभोग्य वस्तू,आयटी, आयटीएस, ऑफिस ऑटोमेशन,अपारंपरिक उर्जा,बँकिंग,विमा आणि वित्त, शिक्षण आणि पर्यटन, खास आकर्षण म्हणजे ईव्ही व एआयची विषयी ३ ७५ हून अधिक स्टॉल्स आहेत.
दरम्यान, चार दिवसांच्या या औद्योगिक महाकुंभाचा समारोप सोमवारी (दि. १) सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. ज्यांनी अजून प्रदर्शन बघितले नसेल त्यांनी त्यांनी अवश्य हे प्रदर्शन बघावे असे आवाहन प्रदर्शनाचे चेअरमन वरूण तलवार यांनी केले. दरम्यान रविवारी प्रदर्शन बघणाऱ्या मान्यवरांमध्ये धुळ्याच्या खासदार डॉ.शोभा बच्छाव, म्हाडाचे क्षेत्रिय अध्यक्ष रंजन ठाकरे, कामगार उपायुक्त विकास माळी, इनोवा रबरचे व्यवस्थापकीय संचालक, सचिन आंबर्डेकर, कोसाचे व्यवस्थापकीय संचालक गौरव गुप्ता, जेएसडब्ल्यू/ ज एसएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयदीप भट्टाचार्य, वाहतूक संघटनेचे नेते राजेंद् फड आदींचा समावेश होता.