AI and Automation Jobs Impact 
नाशिक

AI and Automation Jobs Impact | एआय अन् ऑटोमेशनमुळे पारंपरिक नोकऱ्यांना धोका

बदलत्या तंत्रज्ञानामुळे रोजगार क्षेत्रात मोठी उलथापालथ : फ्रेशर्स, बॅक ऑफिस आणि रिपीट कामांवर सर्वाधिक परिणाम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : धनराज माळी

कृत्रिम बुद्धिमत्ता (Al) आणि ऑटोमेशनच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे महाराष्ट्रातील पारंपरिक रोजगार व्यवस्थेत मोठे बदल दिसू लागले आहेत. विशेषतः आय टी, बँकिंग, ग्राहक सेवा, डेटा एंट्री, अकाउंटिंग, उत्पादन उद्योग आणि बॅक ऑफिस क्षेत्रातील अनेक कामे आता AI आधारित सॉफ्टवेअर आणि मशीनद्वारे केली जात असल्याने हजारो कर्मचाऱ्यांमध्ये नोकरीच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि ठाणे या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आयटी आणि सेवा उद्योग कार्यरत आहेत.

या क्षेत्रात गेल्या काही वर्षात चॅट जीपीटी, एआय चॅटबोट, अॅटोमेटेड कोडींग, व्हाईस असिस्टंट, आरपीए आणि मशिन लर्निंग आधारित प्रणालींचा वापर वाढल्याने कंपन्यांचा मनुष्यबळावरील खर्च कमी होत आहे. तज्ज्ञांच्या मते रिपेटेटिव्ह म्हणजे वारंवार एकाच प्रकारची कामे करणाऱ्या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. डेटा एंट्री, टेलिकॉलिंग, बेसिक अकाउंटिंग, ग्राहक तक्रार निवारण, बँक ऑफिस प्रक्रिया आणि प्राथमिक स्तरावरील आयटी सपोर्ट ही कामे आता काही मिनिटांत एआय प्रणालीद्वारे पूर्ण होत आहेत.

भारतामध्ये एआय संबंधित रोजगार संधी वाढत असल्या तरी पारंपरिक भरती प्रक्रियेत घट होत असल्याचे चित्र आहे. विविध रोजगार अभ्यासांनुसार, २०२५ मध्ये भारतात जवळपास २.९ लाख एआयसंबंधित नोकऱ्या निर्माण झाल्या असून २०२६ मध्ये या क्षेत्रात आणखी ३२ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे पारंपरिक आयटी क्षेत्रातील एंट्री लेव्हल भरतीचा वेग मंदावल्याचेही दिसून येत आहे. महाराष्ट्रातील आयटी उद्योगासाठी पुणे हे प्रमुख केंद्र मानले जाते.

येथे अनेक कंपन्यांनी ऑटोमेटेड टेस्टींग, एआय कोर्डीग असिस्टंट आणि क्लाऊड आधारित प्रणालींचा वापर सुरू केला आहे. यामुळे कमी कौशल्य असलेल्या कामगारांची गरज कमी होत असल्याचे उद्योग क्षेत्रातील जाणकार सांगतात. अनेक कंपन्या आता "डिग्री पेक्षा "कौशल्य" ला प्राधान्य देत असून एआय टुल्स हाताळू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी वाढत आहे. याचबरोबर उत्पादन उद्योगातही ऑटोमेशनचा वापर वाढत आहे. एमआयडीसी भागांतील काही कारखान्यांमध्ये मशीन आधारित उत्पादन प्रक्रिया, डिजिटल नियंत्रण प्रणाली आणि रोबोटिक उपकरणांचा वापर वाढल्याने पारंपरिक कामगारांची आवश्यकता कमी होत आहे. भविष्यात ही प्रक्रिया अधिक वेगाने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एआय मुळे केवळ नोकऱ्यांवर संकटच निर्माण होत नसून नवीन संधी देखील उपलब्ध होत आहेत. एआय इंजिनियस, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, डाटा अॅनालिसीस्ट, रोबॅटीक स्पेशालिस्ट, क्लाऊड इंजिनियर्स आणि प्रॉम्ट इंजिनियर्स यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये रोजगार वाढताना दिसत आहे. त्यामुळे कौशल्यविकास आणि नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, पुढील काही वर्षांत रेसकिलिंग आणि "अपस्किलिंग " अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. एआय सोबत काम करण्याची क्षमता विकसित करणारे कर्मचारी भविष्यात अधिक टिकाव धरू शकतील. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे.

दरम्यान, एआयमुळे रोजगार क्षेत्रात निर्माण होणाऱ्या बदलांबाबत राज्य सरकारने कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांवर अधिक भर देण्याची गरज आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर तरुण बेरोजगारीचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम

डेटा एंट्री, टेलिकॉलिंग, बँक ऑफिस, बेसिक अकाउंटिंग, ग्राहक सेवा, प्राथमिक आयटी सपोर्ट, रिपीट स्वरूपाची कार्यालयीन कामे

या क्षेत्रात वाढती संधी

एआय इंजिनिरिंग, सायबर सिक्युरीटी, रोबोटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटींग, डाटा अॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटींग, अॅटोमेशन मॅनेजमेंट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT