नाशिक : महानगरपालिका कार्यालयासमोर खड्ड्यांविरोधात थाळी नाद आंदोलन करताना आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते. दुसऱ्या छायाचित्रात खड्ड्यांमुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांना आर्थिक मदत व खड्डेमुक्त नाशिकच्या मागणीसाठी तिरडी आंदोलन करताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते. 
नाशिक

Political Protest Over Potholes | 'आप'चा थाळीनाद, 'वंचित'कडून तिरडी

आंदोलनः खड्ड्यांवरून महापालिकेविरोधात तापले राजकीय वातावरण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या प्रश्नावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. शहरातील वाढते अपघात, निकृष्ट दर्जाचे रस्ते दुरुस्ती आणि सिंहस्थ विकासकामांतील कथित अनियमितता यावरून आम आदमी पार्टी (आप) आणि वंचित बहुजन आघाडी यांनी मंगळवारी (दि.४) स्वतंत्र आंदोलन करत महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

'आप'ने रस्ते दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेची चौकशी, दोषींवर कारवाई आणि सात दिवसांत खड्डे बुजविण्याची मागणी करत 'थाळीनाद' आंदोलन केले, तर वंचित बहुजन आघाडीने 'तिरडी मोर्चा' काढून खड्यांमुळे झालेल्या मृत्यूंसाठी जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची, मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत व शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. या दोन्ही आंदोलनांमुळे शहरातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, महापालिका प्रशासनावरील दबाव वाढला आहे

शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्यांमुळे वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजविणे, रस्ते दुरुस्तीच्या टेंडर प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करणे आणि दोषी अधिकारी, अभियंते व कंत्राटदारांवर कठोर कारवाईची मागणी करत पक्षाने महापालिका शहर अभियंता संजय अग्रवाल आपचे प्रदेश संघटनमंत्री नविनदरसिंग अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

रस्ते दुरुस्तीची कामे निकृष्ट झाल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. पक्षाने खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत, जखमींना नुकसानभरपाई तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गुणवत्तेची नियमित तपासणी करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. सात दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा दिला. निवेदनावर नविनदरसिंग अहलुवालिया, विलास पारखे, कल्पिद गरेवाल, माजिद पठाण, भूषण पाटील, नूतन कोल्हे, गोरख मोहिते, पद्मनाभ अहिरराव, सचिन साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या मदतीची वंचितची मागणी

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी 'तिरडी मोर्चा' काढत महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला. सिंहस्थ विकासाच्या नावाखाली शहरातील रस्ते खोदून ठेवल्याचा आरोप करत प्रशासन, कंत्राटदार आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. जिल्हाध्यक्ष अॅड. चेतन गांगुर्डे यांनी महापालिका शहर अभियंता संजय अग्रवाल यांना निवेदन दिले. खड्धांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच खड्धांमुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. रस्ते कामांतील कथित कमिशनखोरीची चौकशी, अतिरिक्त आर्थिक भार टाकणाऱ्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर कारवाई, तसेच ड्रेनेज पाइपलाइनच्या कथित चुकीच्या कामांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. आंदोलनाद्वारे शहरातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली. या आंदोलनात शहराध्यक्ष दिनेश जाधव, उर्मिला गायकवाड, मिहीर गजबे, बाळासाहेब शिंदे, डॉ. चित्रा कुन्हे, सचिन हिरे, लीना खरे आदी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT