

हरसूल : महाराष्ट्र गुजरात हद्दीवरील नाशिक जिल्ह्यातील घोडमाणी येथे सोमवारी (दि. ३) सेंद्री नदीवरील तुटलेल्या लोखंडी पुलावरून पडून नदीच्या प्रवाहात वाहून गेलेले सोमा चिमा चौधरी (६७) यांचा मंगळवारी (दि. ४) दुसऱ्या दिवशीही पत्ता लागला नाही. प्रशासनाकडून शोध मोहीम राबविली जात असली, तरी पाऊस आणि पाण्याचा प्रचंड वेग यामुळे मोहिमेत मोठे अडथळे येत आहेत.
दरम्यान, बेपत्ता चौधरी यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ अद्यापही नदीकाठावर बसून अश्रृंना वाट मोकळी करून देत शोक व्यक्त करीत आहेत. जोरदार अतिवृष्टीमुळे घोडमाणी ते कामथपाडा गावाला जोडणारा सेंद्री नदीवरील मुख्य लोखंडी पूल वाहून गेला होता. ग्रामस्थांनी स्वतः बल्ल्या लावून तात्पुरती मलमपट्टी केली होती. याच पुलावरून दुर्घटना घडली. या घटनेला ४८ तास उलटून गेले, तरी प्रशासनाने अद्याप गावासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
नागरिकांना दैनंदिन कामांसाठी तुटलेल्या याच धोकादायक पुलावरून किंवा खालील चेक डॅमच्या (बंधाऱ्याच्या) खालच्या वेगवान नदीप्रवाहातून जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत आहे. लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना हा टप्पा पार करताना मोठा प्राणांतिक धोका पत्करावा लागत आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
सीमावर्ती भागातील घोडमाणी आणि कामथपाडा परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाच्या या उदासीन कारभाराविरोधात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. प्रशासन अजून किती बळी जाण्याची वाट पाहात आहे? आपत्कालीन परिस्थितीतही साधी पर्यायी व्यवस्था केली जात नसेल, तर आम्ही जगायचे कसे? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
नदीवर तात्पुरता सुरक्षित मार्ग निर्माण करून कायमस्वरूपी पक्का पूल उभारण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, या मागणीने जोर धरला आहे.