9 employees dismissed in Naigaon Gharkul case
नायगाव / बाळासाहेब पांडे
नायगाव पंचायत समितीतील घरकुल योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात आमदार राजेश पवार यांच्या दणक्यानंतर अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी तातडीने कारवाई करत नऊ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. या निर्णयाने नायगाव प्रशासनात खळबळ उडाली आहे.
अलीकडेच आमदार राजेश पवार यांनी पंचायत समिती कार्यालयास अचानक भेट देऊन घरकुल लाभार्थ्यांकडून लाच घेतल्याची कबुली दिलेल्या काही कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीईओ कावली यांनी संबंधित गृह निर्माण अभियंते, डाटा एंट्री ऑपरेटर आणि इतर अधिकाऱ्यांची चौकशी केली. चौकशीत दोषी आढळल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून, त्यांना पदावरून कमी केल्याचे आदेश २९ ऑक्टोबर रोजी काढण्यात आले आहेत.
या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, आ. राजेश पवार यांनी ८-नायगाव विधानसभा मतदारसंघातील सभा दरम्यान घरकुल लाभार्थ्यांकडून लाच घेतल्याचा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर सीईओंनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आणि आज त्या प्रकरणात कारवाई झाली.
या घटनेमुळे नायगाव पंचायत समितीतील घरकुल विभागातील सडलेली कार्यपद्धती पुन्हा एकदा उघड झाली असून, आमदारांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनातील शिस्त पुन्हा प्रस्थापित होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.