Nashik Ramjhula Project  
नाशिक

Nashik Ramjhula Project | नाशिकच्या गोदाघाटावर उभारणार प्रभु श्रीरामांची 85 फुटी भव्य मूर्ती! 'रामझुला' प्रकल्पात मोठा बदल

Nashik Ramjhula Project | 'रामझुला'अंतर्गत ६.५६ कोटींचे काम विनानिविदा देण्याचा महासभेवर प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोदाघाट परिसरातील रामकुंड ते गणेशवाडी भाजी मार्केटदरम्यान प्रस्तावित 'रामझुला' प्रकल्पाला आता नव्या कामांची जोड मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत गोदाघाटावर प्रभु श्रीरामांची सुमारे ८५ फूट उंच प्रतिकृती उभारली जाणार आहे. या मूर्तीसह पुलाच्या दोन्ही बाजूंना रॅम्प तयार करण्यासाठी तब्बल ६ कोटी ५६ लाख रुपयांचे अतिरिक्त काम विद्यमान कंत्राटदाराकडून विनानिविदा करून घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने महासभेच्या मंजुरीसाठी ठेवला आहे.

'रामझुला' प्रकल्पाच्या मूळ कामाची निविदा रक्कम २६ कोटी २६ लाख रुपये असून, त्यावर ९ टक्के अधिक दराने काम देण्यात आले आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश १८ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला आहे. आता प्रकल्पात रॅम्प, विद्युत प्रकाशयोजना आणि प्रभु श्रीरामांची प्रतिकृती उभारण्याची अतिरिक्त कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

बालाजी कोट ते गणेशवाडी भाजी मार्केटदरम्यान पदचारी पुलाच्या दोन्ही बाजूंनी रॅम्प उभारण्यात येणार आहेत. यामुळे भाविक, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना पुलावर जाण्या-येण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेऊन हा मार्ग सुरक्षित आणि उपयोगी ठरणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

या अतिरिक्त कामांसाठी ६ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून, हा निधी महापालिकेच्या 'सिंहस्थ कामे मनपा अंतर्गत' या लेखाशीर्षातून उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.

विद्यमान कंत्राटदाराकडून मूळ निविदा रक्कमेच्या २५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कामे करून घेण्याची तरतूद असल्याचा आधार घेत, नव्याने निविदा न मागवता हे काम त्याच कंत्राटदाराकडून करून घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. मंगळवारी (दि. ६) होत असलेल्या महासभेच्या पटलावर जादा विषयांत हा प्रस्ताव सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

पुलाचा प्रस्तावित 'धनुष्य' आकार बदलणार:

प्रभु श्रीरामांच्या प्रतिकृतीच्या उभारणीसाठी स्टेजिंग करावे लागणार असून, प्रतिकृतीच्या रचनेबाबतही बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीच्या आराखड्यात धनुष्याच्या प्रतिकृतीच्या पुलाचा समावेश होता. मात्र, धनुष्यामुळे भविष्यात आचारसंहितेच्या काळात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर धनुष्याविना प्रभु श्रीरामांची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद आहे.

जादा खर्चाचा भार मनपावर:

या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर 'रामझुल्या'चे रॅम्प, प्रकाशयोजना आणि प्रभु श्रीरामांच्या प्रतिकृतीचे काम पुढे जाणार आहे. त्यामुळे 'रामझुल्या'च्या मूळ कामासोबत आता ६.५६ कोटींच्या अतिरिक्त कामाचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT