नाशिक

Nashik Heavy Rain Crop Damage | जिल्ह्यात 80 हेक्टर शेतीला पुराचा फटका; 429 नागरिकांचे स्थलांतर अनेक घरांसह गोठे, झोपड्यांचे नुकसान

Nashik Heavy Rain Crop Damage | जिल्ह्यात ८० हेक्टर शेतीला पुराचा फटका; ४२९ नागरिकांचे स्थलांतर : अनेक घरांसह गोठे, झोपड्यांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यात गत आठवडाभरात झालेल्या पावसामुळे विविध ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन जिल्ह्यातील सुमारे ४८ शेतकऱ्यांच्या ८० हेक्टर शेतीला फटका बसला. यात मौजे आंबेवाडी येथे झालेल्या भूस्खलनामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वनपट्ट्यातील सुमारे ८ शेतकऱ्यांच्या १५ हेक्टर क्षेत्राास, तर खासगी क्षेत्रातील सुमारे ४० शेतकऱ्यांच्या ६५ हेक्टर शेतीस फटका बसला.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नैसर्गिक आपत्तीची स्थिती कायम असून, अनेक ठिकाणी घरांचे नुकसान, भूस्खलन, शेतीची हानी आणि वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात गत दोन दिवसांत ३२ घरांची पडझड झाली असून इगतपुरी, निफाड, सुरगाणा आणि कळवण तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे.

सुरगाणा तालुक्यात दोन गोठे व झोपड्यांचेही नुकसान झाले आहे. अधिकृत अहवालात कोणतीही मनुष्यहानी झालेली नसल्याचे सांगण्यात आले असले तरी बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील शेतकरी समाधान सहादू पगार यांचा शेतीपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. या घटनेचा पंचनामा सुरू आहे. तर इगतपुरी व सिन्नर तालुक्यात प्रत्येकी एक व्यक्ती जखमी झाली आहे. महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते-फोडसेवाडी रस्ता अद्याप बंद असून, सुरगाणा तालुक्यातील गहाले-चिंचदा पूल पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्ग सुरू केला आहे. मात्र निफाड, पेठ, कळवण, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, मालेगाव, नाशिक व चांदवड तालुक्यांतील बहुतांश बंद रस्ते आणि पूल पाणी ओसरल्यानंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुले केले आहेत.

सापुतारा-वणी मार्गावरील घागबारी येथे अडकलेले अवजड वाहन हटवून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. तर पूरपरिस्थितीमुळे निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी आणि चाटोरी येथील एकूण ४२९ नागरिकांचे स्थलांतर केले आहे.

या नागरिकांची जनता इंग्लिश स्कूल, गोदावरी सेवा सहकारी संस्था हॉल तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा आणि मारुती मंदिर येथे तात्पुरती व्यवस्था केली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, नुकसानग्रस्त भागांत मदतकार्य, पंचनामे आणि आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT