

दुतोंड्या मारुती मानेपर्यंत बुडाला
रामतीर्थ परिसरातील मंदिरे पाण्याखाली
कपालेश्वर मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी
सराफ, भांडीबाजारात शिरले पाणी, व्यापाऱ्यांनी दुकाने केली खाली
रामसेतू पूल मोसमात दुसऱ्यांदा बुडाला
गाडगे महाराज पुलाला गोदावरीच्या पाण्याचा स्पर्श
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
संपूर्ण शहर तुंबले, ठिकठिकाणी साचले पाणी
सिंहस्थ कामांसाठी केलेले खड्डे बनले तळे
झाडे उन्मळली, विजेचे पोल कोसळल्याने बत्ती गुल
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रात्री अन् दिवसभर कोसळलेल्या संततधारेने नाशिक शहरात दाणादाण उडवून दिली. संपूर्ण शहर जलमय झाले असून, शहरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने, जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. अवघ्या २४ तासांत तब्बल १३२ मिमी पावसाची नोंद झाल्याने, गोदावरीला १५ दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा मोठा पूर आला. रामतीर्थ परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने, परिसरातील सर्वच लहान मंदिरांना गोदावरीने जलाभिषेक केला.
गोदावरीच्या पुरामुळे रामतीर्थ परिसरातील विठ्ठलमूर्ती मंदिर, गोदावरी मंदिर, दत्त मंदिर, अर्धनारी नटेश्वर मंदिर, खंडोबाच्या पायऱ्यांवरील मंदिर, नारोशंकर मंदिर, मारुती मंदिर आणि कपालेश्वर मंदिर या मंदिरांना गोदावरीने जलाभिषेक केला. कपालेश्वर मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले, तर दुतोंड्या मारुतीची मूर्ती मानेपर्यंत पाण्यात बुडाली.
नदीपात्रातील परिसरात प्रशासनाने खबरदारीचा इशारा देत नाशिककरांना दूर राहण्याचे आवाहन केले. पुराच्या पाण्यामुळे रामसेतू पूल मोसमात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला. गाडगे महाराज पुलालाही गोदावरीच्या पाण्याचा स्पर्श झाला. नदीकाठावरील घाट परिसर पूर्णतः बंद करण्यात आला असून, नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले.
शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना प्रशासनाची पायपीट करावी लागली. काही भागात दुकानांच्या तळघरांत पाणी साचल्याने नुकसान झाले. संपूर्ण शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. अशोक चौक, जुना भद्रकाली परिसर आणि सखल भागांमध्ये घरांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांना पावसाच्या पाण्याने तलावाचे स्वरूप आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी दुचाकीस्वार घसरण्याच्या घटनाही घडल्या. शहापूर परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य भिजले. महापालिका, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी काही भागांत मदतकार्य सुरू केले.
नागरिकांनीही पाणी उपसण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही भागांत वीजखांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली.
झाडे हटवण्यासाठी महापालिका आणि अग्निशमन दलाचे पथक रात्रभर कार्यरत होते. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक बाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सराफ, भांडीबाजारात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. लोकांनी तातडीने दुकाने रिकामी करून माल सुरक्षितस्थळी हलविला. भांडी बाजारात दुपारीच पाणी शिरल्याने, विक्रेत्यांनी लगबग दुकाने खाली केली. याशिवाय गोदाकिनारी असलेल्या टपऱ्या सुरक्षित हलवण्यात आल्या. गंगापूर धरणातून विसर्ग केला जाणार असल्याने, सायंकाळी उशिरापर्यंत दुकाने खाली करण्याचे काम सुरू होते.
या पावसाने एकीकडे गोदावरीला नवसंजीवनी मिळाली असली, तरी दुसरीकडे शहरातील पायाभूत सुविधांची मर्यादा पुन्हा एकदा उघडी झाली. विशेषतः सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांमुळे उखडलेले रस्ते, अपूरी ड्रेनेज व्यवस्था आणि सखल भागातील पाणी साचण्याची समस्या यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. १५ दिवसांत दुसऱ्यांदा आलेल्या मोठ्या पुरामुळे प्रशासनासमोरही आपत्ती व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पुरामुळे रामतीर्थ येथील गांधी तलाव परिसरात लोकेश शिवाजी शिंदे (४१, रा. गंडूर, चांदवड), शर्मा (राहणार राहिली) या दोन व्यक्ती अडकल्याची घटना घडली. मात्र, स्थानिक जीवरक्षक दल, पंचवटी विभागीय अग्निशमन दल आणि आदिवासी जीवरक्षक दलाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धाडसी बचावकार्य राबवून दोघांची सुखरूप सुटका केली.
बोट, लाइफरिंग आणि दोराच्या साहाय्याने हे बचावकार्य यशस्वी करण्यात आले. या दोघांनाही पुराच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या बचाव मोहिमेत पंचवटी विभागीय अग्निशमन दलाचे संजय कानडे, बाळासाहेब लहामगे, सुनील शिलावट, प्रथमेश वार, अक्षय गांगुर्डे, प्रसाद पलोरेकर, प्रणय बनकर, ऋषी जाधव,
गणेश तांबोळी, राहुल आहेर, किशोर पाटील, दिनेश लामरोळे, भीमराव खोडे, इसाक शेख, अभिषेक वैरागी तसेच तलाव समितीचे अमित देशमुख, सुदाम सोनावणे आणि बाळासाहेब काकड यांनी जिवाची बाजी लावून सहभाग घेतला. याशिवाय प्रशांत पवार, नितीन राजपूत यासह 'गंगापूर आदिवासी जीवरक्षक दल' पूरग्रस्त भागात तैनात होते. स्वच्छता निरीक्षक गणेश तांबे, आसिफ पठाण, अनिल नेरकर, लक्ष्मण, पांडुरंग जाधव, सुनील देवीदास बोरसे, संतोष दिघे, शंकर माळी, दुर्केश वाघमारे आणि सुधीर सहाणे यांनीही योगदान दिले.