नाशिक: नाशिक अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या जागेच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील २०७ भूमिहीन कुटुंबांसाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी मिळाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत बागलाण, मालेगाव, सिन्नर आणि येवला या चार तालुक्यांतील पात्र कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जमीन विनामूल्य मंजूर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, याबाबतचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत.
घरकुल योजनेत पात्र ठरूनही स्वतःची जागा नसल्याने अनेक गरीब कुटुंबांना घर बांधता येत नव्हते. काही कुटुंबांना झोपड्यांमध्ये, तर काहींना इतरांच्या जागेवर निवारा घ्यावा लागत होता. भूमिहीन कुटुंबांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी महसूल विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले. त्यातून २०७ कुटुंबांसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मार्गी लागला. यात तालुकानिहाय विचार करता बागलाण तालुक्यातील सहा गावांमधील ९४ कुटुंबांना जागा मंजूर झाली आहे. मालेगाव तालुक्यातील देवघट, तिळवण, वहऱ्हाणे आणि झोडगे या चार गावांतील ७८ कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
यामध्ये झोडगे येथील सर्वाधिक ५६ कुटुंबांचा समावेश आहे. तर सिन्नर तालुक्यातील बोरखिंड येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) अंतर्गत १० कुटुंबांना, तर येवला तालुक्यातील मुखेड येथील २५ कुटुंबांना घरकुलासाठी जमीन मंजूर करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींकडे जमिनी वर्ग मंजूर जमिनींचे भूखंड संबंधित ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आले आहेत. निवासी अभिन्यास मंजूर करून नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना भाडेपट्ट्याने किंवा प्रचलित धोरणानुसार जमिनीचे वितरण केले जाणार आहे.
ग्रमपंचायतींकडे जमिनी वर्ग
लाभार्थ्यांच्या नावावर यापूर्वी घर किंवा भूखंड नसल्याची खातरजमा करूनच प्रत्यक्ष ताबा देण्याचे निर्देश तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. केवळ घरकुल मंजूर करून न थांबता त्यासाठी आवश्यक असलेली जागाही उपलब्ध करून देण्याच्या प्रशासनाच्या या निर्णयामुळे २०७ कुटुंबांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.