नाशिक: केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. आर. जी. मुरलीकृष्ण, सीईओ मंगेश इंदापवार यांना सातबारा उतारा हस्तांतरित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद Admin
नाशिक

16.80 Hectare Land Record for Sanskrit University | संस्कृत विद्यापीठाला 16.80 हेक्टरचा सातबारा

नाशिकमध्ये ज्ञानपरंपरा, तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे केंद्र उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भारतीय ज्ञानपरंपरेला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देत नाशिकला देशातील अग्रगण्य शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या नाशिक परिसरामुळे संस्कृत, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प राज्याच्या शैक्षणिक विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत सह्याद्री अतिथिगृहामध्ये केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, दिल्ली अंतर्गत नाशिक परिसरासाठी आरक्षित केलेल्या १६.८० हेक्टर जमिनीचा सातबारा उतारा विद्यापीठाच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केला. यावेळी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. आर. जी. मुरलीकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश इंदापवार, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा आणि आधुनिक संशोधन यांचा समन्वय साधणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आज देशाला गरज असून, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा नाशिक परिसर हा याच संकल्पनेचे मूर्त रूप ठरेल. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना संस्कृतसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासाची संधी उपलब्ध होणार असून, संशोधन आणि नवोपक्रमालाही चालना मिळेल. त्यामुळे विद्यापीठाच्या उभारणीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

शिलापूर गावात प्रस्तावित नाशिक रिंगरोडलगत ही जमीन असून, ७/१२ उतारा हस्तांतरित झाल्यामुळे संबंधित जमिनीचे अभिलेख विद्यापीठाच्या नावे वर्ग झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने नाशिक येथे अत्याधुनिक, बहुविद्याशाखीय शैक्षणिक परिसर उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, तो केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT