

मुंबई: नाशिक येथील कुंभमेळ्यासाठीच्या विकासकामांची कंत्राटे ही गुणवत्ता आणि पारदर्शक पद्धतीने देण्यात आली आहेत. आपल्या देशात कंत्राटे देताना संबंधित व्यक्तीची जात, धर्म, भाषा पाहिली जात नाही.
स्पर्धात्मक निविदा पद्धतीनेच कामे दिली जातात, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना उत्तर दिले. कुंभमेळ्याची सर्व कामे गुजराती कंत्राटदारांना दिल्याचा आरोप राज यांनी केला होता. त्यावर, मराठी कंत्राटदारांची नावे त्यांना पाठवू, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
फडणवीस यांनी शुक्रवारी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य मंत्री, स्थानिक आमदार, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खड्ड्यांवरून ‘एमजीएल’ला फटकारले
नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून फडणवीस यांनी महानगर गॅस कंपनी (एमजीएल) ला फटकारले. रस्त्यांची मुख्य अडचण ‘एमजीएल’मुळे झाली आहे. गॅस पाईपलाईन जोडणीचे काम धिम्यागतीने सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख जोडणी पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ४० हजारच जोडण्या झाल्या आहेत. या गॅस जोडणीच्या कामांसाठी नाशिक महापालिकेशी समन्वय साधून प्रलंबित गॅस कनेक्शनची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
गॅस पाईपलाईनच्या कामाला वेग देण्यास खडसावण्यात आले आहे. महापालिकेलादेखील रस्त्यांबद्दल सूचना देणारे फलक लावण्यास सांगितले आहे. आखाती युद्धामुळे ३ महिने डांबराचे उत्पादन ठप्प होते. कुंभमेळ्याच्या कामांसाठी डांबराची आवश्यकता लक्षात घेत, केंद्र सरकारच्या सर्व कंपन्यांना डांबरपुरवठा करण्यासाठी पत्र पाठविल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळा हा प्रतिष्ठेचा विषय
सिंहस्थ कुंभमेळा हा राज्याच्या प्रतिष्ठेचा विषय असून, सर्व विभागांनी कालबद्ध नियोजन, परस्पर समन्वय आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे, तसेच कुंभमेळ्याची तयारी वेळेत पूर्ण होईल यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
मराठी कंत्राटदारांची नावे राज ठाकरे यांना पाठवू
या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी नाशिक कुंभच्या कामात गुजरातच्या कंत्राटदारांना कामे मिळाल्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप फेटाळून लावला. कंपनीच्या निविदेची क्षमता, तसेच कंपनी बघितली जाते. कंपनीमागे कोण हे पाहिले जात नाही. कंत्राटे ही स्पर्धात्मक पद्धतीनेच दिली आहेत, त्यातही तीन प्रकारची क्वॉलिटी चेक लावली आहेत. कंपनीशी संबंधित मराठी लोकांचीही नावे राज ठाकरे यांना पाठवून देऊ, असे फडणवीस म्हणाले.