उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवारात ढगफुुटीसद़ृश पाऊस

गणेश सोनवणे

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी शिवारात जुन्या पंचाळे रस्त्यावर व मिठसागरे शिवारात अर्धा तास ढगफुुटीसद़ृश पाऊस झाला. या वेळेत शेतात आणि अन्यत्र पाणीच पाणी झाले होते. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास पांगरी शिवारात अभंग मळा, पंचाळे शिवारातील जाधव मळा, मिठसागरे शिवारात मुसळधार पाऊस सुरू झाला. अवघ्या अर्ध्या तासात शेताचे बांध 'फुल्ल' झाल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. रस्त्याने काहीच दिसत नव्हते. जनावरांचे मोठे हाल झाले. ढगफुटीसद़ृश पाऊस झाल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र होते.

या पावसाने भारत पांगारकर यांच्या शेताजवळ असलेला बंधारा ओव्हरफ्लो झाला. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सिन्नरच्या पूर्व भागात समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावला आहे. पेरण्यायोग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरण्या करतील, असे चित्र आहे. अनेकांच्या शेतात पाणी असल्याने त्यांना वाफसा होण्याची प्रतीक्षा असेल.

कोरडी विहीर काही मिनिटांत तुडुंब
पांगरी शिवारात दुपारी दोनच्या सुमारास ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. पांगरी, पंचाळे, मिठसागरे या गावांच्या सरहद्दीवर झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले होते. पांगरी शिवारातील गणपत अभंग यांच्या शेतातील विहिरीचा कथडा तोडून पाणी विहिरीत कोसळले. अवघ्या काही मिनिटांत तळ गाठलेली कोरडी विहिरी तुडुंब भरल्याचे चित्र होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT