वारी : विठ्ठल माझा माझा! | पुढारी

वारी : विठ्ठल माझा माझा!

शेगाव येथील गजानन महाराज संस्थानच्या वतीने 1950 मध्ये संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी पालखी सोहळा सुरू केला. सोहळ्यात संस्थानची एकच दिंडी असते. अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील पंचेचाळीस वर्षांखालील निरोगी व्यक्‍तींना सोहळ्यात प्रवेश दिला जातो.

पालखी प्रस्थान ज्येष्ठ शद्ध षष्ठीला होते. सोहळ्यात दिंडीचे व देवाचे असे दोन विणेकरी असतात. दिंडीचे विणेकरी दिंडीसोबत चालतात, तर देवाचे विणेकरी पालखीसोबत चालतात. संस्थानच्या सुरक्षारक्षकांची एक टीम असते. भजन थांबले की, सनई-चौघडा वाजायला सुरुवात होते. सोहळ्यात रिंगणाची पद्धत नाही. रोज केल्या जाणार्‍या पावल्या पाहण्यासारख्या असतात. मार्गात अंबाजोगाई, तुळजापूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, गंगाखेड, नरसी नामदेव, मंगळवेढा इ. तीर्थक्षेत्र लागतात.

अंबाजोगाई व तुळजापूर येथील देवीच्या मंदिरांसमोर वारकरी संतांनी लिहिलेले गोंधळाचे अभंग म्हणून गोंधळ होतो. ठराविक ठिकाणी कीर्तने होतात. मुक्‍कामासाठी छोटा स्टीलचा मंडप, रांगेसाठीची व्यवस्था इ. सेटअप संस्थानचे स्वतःचे असते. नैवेद्य पंगतीवाल्यांतर्फे होतो. पंगत स्थानिक गावकरी अथवा एक ते दोन गाव मिळून घालतात. सोहळ्यासोबत संस्थानचे दोन पाण्याचे टँकर, दोन अ‍ॅम्ब्युलन्स व एक संस्थानच्या साहित्य विक्रीची व देणगीची गाडी असते. संस्थानचे विश्‍वस्त वाटचालीमध्ये सत्कार स्वीकारत नाहीत अथवा कोणाचाही सत्कार करण्यासाठी स्वतः पुढे येत नाहीत.

आषाढ शुद्ध नवमीला पालखी पंढरपुरात पोहोचते. एकादशीला पहाटे दोन वाजता नगरप्रदक्षिणेला जाते. ‘श्रीं’ना चंद्रभागा स्नान घालण्याची पद्धत नाही. द्वादशीला संस्थानचा नैवेद्य श्री विठ्ठल मंदिरात जातो. पौर्णिमेला पहाटे पाच वाजता पालखी गोपाळपूरला काला करण्यासाठी जाते. तेथून आल्यावर सकाळी 9 वाजता परतीचा प्रवास सुरू होतो. यावर्षी सोहळ्यामध्ये साधारणत: साडेसातशे वारकरी सहभागी असतील. पालखीच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजे ते शेगाव प्रवासात एक ते सव्वा लाख भाविक सहभागी होतात. शेगावमधील गजानन वाटिका ते मंदिर हे अंतर 4 कि.मी. आहे; पण हे अंतर कापायला चार ते पाच तास लागतात. रात्री पालखी मंदिरात आल्यावर पावल्या होतात. आरती होऊन सोहळ्याची सांगता होते.

अभय जगताप

Back to top button