नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील प्रत्येक शहराची स्वंतत्र ओळख आहे. नाशिकाला धार्मिक पर्यटनासह वाइन शहर म्हणून ओळख मिळाली आहे. आता नाशिकला भारताची फॅशन कॅपिटल म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी जुलैच्या दुसर्या आठवड्यात 'नाशिक फॅशन वीक'चे आयोजन केले जाणार आहे. त्याची तारीख लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती संदीप विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी दिली.
'नाशिक फॅशन वीक' सुरू करण्याची योजना संदीप विद्यापीठाने आखली असून, त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संदीप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेंद्र सिन्हा, अधिष्ठाता संदीप प्रसाद व फॅशन तज्ज्ञ सोमेश सिंग उपस्थित होते. मागणी आणि पुरवठ्यातील प्रचंड तफावत आणि डिझायनर तसेच विणकर यांच्यातील सहनिर्मिती लक्षात घेऊन फॅशन वीक होणार आहे. त्या माध्यमातून विणकरांपासून डिझायनरपर्यंत जोडण्यास मदत होणार असल्याचे डॉ. झा यांनी सांगितले.
संदीप विद्यापीठाने 'क्रिएटिव्ह इकॉनॉमिक्स'ला चालना देण्यासाठी नवे बदल केले असून, नाशिक फॅशन वीक याचाच भाग आहे. नाशिक वर्ल्ड अॅपेरल अॅण्ड टेक्स्टाइल्स नकाशावर नाशिक फॅशन वीक डिझायनर्सना त्यांची सर्जनशीलता थेट प्रेक्षकांसमोर दाखवण्याची संधी मिळणार आहे. या वीकच्या माध्यमातून नवकल्पनांसह ग्लॅमर आणण्यासाठी सज्ज असल्याचे डॉ. झा यांनी स्पष्ट केले.