उत्तर महाराष्ट्र

नाशिक : 107 वय असलेल्या आजीबाईंच्या भेटीला मंत्री जातात तेव्हा….

गणेश सोनवणे

नाशिक (लासलगाव) : आज धकाधकीच्या जीवनात वयाची शंभरी पार करणे खरोखरच अवघड आहे. अशा वेळी चितेगाव तालुका निफाड येथील अंजनाबाई गाढे यांनी वयाची शंभरी पार करत तब्बल 107 वर्षे पूर्ण करत 108 व्या वर्षात पदार्पण केले आहे हे कौतुकास्पद आहे.

निफाड तालुक्यात लग्नसमारंभासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार गेल्या असताना अचानक या आजींच्या 107 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फलक लावलेला बघितला आणि शंभरी पार केलेल्या आजीबाईंना भेटण्याचे अचानक ठरले. मग सर्व ताफा वळला तो चितेगावच्या गाढे वस्तीवर. गाढे कुटुंबीय अचानक ना. डॉ. भारती पवार यांना बघून क्षणभर स्तंभित झाले. आपले लोकप्रतिनिधी तथा केंद्रीय मंत्री सूचना न देता अचानक आपल्या घरी आल्याचे बघून थोडी तारांबळ उडाली खरी, पण मंत्रिमहोदयांनी आपण आजींना भेटायला आल्याचे सांगितले आणि सर्वांच्या आनंदाला उधाण आले.

आजींचा 107 वा वाढदिवस साजरा झाल्याचे समजले आणि मग आजींना भेटायची तीव्र इच्छा झाल्याने लगेचच आजींचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे घरच्यांना सांगितले. मग काय बाहेरच पडवीत खुर्च्या टाकल्या आणि आजीबाईंना बोलावले. आजींनाही जेव्हा समजले की, आपल्या घरी आपल्याला भेटायला आपल्या ना. डॉ. भारती पवार आल्या आहेत, तर आजींनी उत्स्फूर्तपणे नामदार ताईंना जवळ घेत डोक्यावरून हात फिरवत आशीर्वाद दिला. तू कशी काय मला भेटायला आलीस, असा निरागस प्रश्न आजींनी ताईंना विचारला तेव्हा ताईंनीही आजींना सांगितले की, तुम्ही एवढ्या वर्षं आरोग्यमयी जीवन जगत आहात

वयाची शंभरी पार करूनही एवढ्या ठणठणीत आहात, याचे अप्रूप मला होते आणि देशाची आरोग्यमंत्री म्हणून काम करताना माझ्या मतदारसंघातसुद्धा वयाची शंभरी पार केलेल्या आजी आहेत आणि आपण आजींची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी व तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले, असे त्यांनी सांगितले.

आजीबाईंमुळे घर एकत्रित असल्याचे जाणवले. मुले, नातवंडे, पतवंडे यांच्यासह सर्व परिवार एकाच छताखाली आनंदात नांदतोय, हे बघून एकत्रित भारतीय कुटुंबपद्धतीचेदेखील दर्शन याप्रसंगी झाले. पुढच्या वाढदिवसाला मी अवश्य शुभेच्छा द्यायला येईन, असे म्हणत ना. डॉ. भारती पवार यांनी आजीबाईंचा निरोप घेतला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT