उत्तर महाराष्ट्र

नाशिक : संरक्षण विषयक उत्पादनांसाठी उद्योजकांना व्हेंडरशीप देणार : सुहास झेंडे

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सरंक्षण खात्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीचे उत्पादन करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना व्हेंडरशीप देण्यास तसेच त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास तयार असल्याची माहिती माझगाव डॉक शीप बिल्डर ली. चे मुख्य व्यवस्थापक सुहास झेंडे यांनी दिली. सरंक्षण खात्यातील उत्पादने बनवण्याची व्हेंडरशीप उद्योजकांना मिळावी यासाठी इंडस्ट्रीज अँड मनुफक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना सुहास झेंडे बोलत होते. व्यासपीठावर आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, सचिव योगीता आहेर, खजिनदार राजेंद्र कोठावदे, माझगाव डॉक चे व्यवस्थापक संतोष भांगरे व नीलेश पंडित आदी होते.

संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या उत्पादनांसाठी आपले योगदान देऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी ही नामी संधी असून देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सर्वानी पुढे आले पाहिजे, असे सांगून झेंडे यांनी युद्धनौका, पाणबुडया आणि नौदल तसेच संरक्षण खात्याच्या विविध उत्पादनांची माहिती देऊन पुरवठा साखळी तसेच प्रशिक्षणाबाबत उद्योजकांना माहिती देऊन त्याचे बारकाईने विश्लेषण केले व नंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.

आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी प्रास्ताविकात आयमाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आत्मनिर्भर भारतासाठी 70 टक्क्यांपर्यंत गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार मदत करणार असल्यामुळे उद्योजकांनी त्याचा लाभ घेऊन देशाच्या विकासात हातभार लावावा असे आवाहनही पांचाळ यांनी केले. याबाबतची पुढील बैठक लवकरच होणार आहे. ज्या कुणाला या संदर्भात माहिती हवी असल्यास त्यांनी आयमा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सरचिटणीस ललित बूब यांनी केले. माझगाव डॉकचे व्यवस्थापक संतोष भांगरे व नीलेश पंडित यांनीसुद्धा उद्योजकांच्या विविध शंकांचे निरसन केले. आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी आभार मानले. यावेळी माजी अध्यक्ष विवेक पाटील, प्रमोद वाघ, हर्षद कापडे, जगदीश पाटील, विलास लीधुरे, जयंत पगार, राहुल गांगुर्डे, सुमित बजाज, हेमंत खोंड यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT