मोरगाव-निरा रस्त्यावर आठ लाखांची रोकड लुटली | पुढारी

मोरगाव-निरा रस्त्यावर आठ लाखांची रोकड लुटली

बारामती; पुढारी वृत्तसेवा : लहान मुलांचे कपडे आणण्यासाठी कर्नाटकातील निपाणीकडे जात असलेले वाहन अडवून तिघा चोरट्यांनी धाकाने हे वाहन पळवून नेत त्यातील आठ लाख रुपयांची रोकड लुटून नेली. पुढे काही अंतरावर हे वाहन सोडून त्यांनी पलायन केल्याची घटना मोरगाव-निरा रस्त्यावर शिवशंभो ढाब्याजवळ घडली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी तिघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मोहम्मद अब्दुल रहीम कुरेशी (रा. रमनासपुरा, शहागंज बनिमिया दर्गा, संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली.

गुरुवारी (दि. 30) पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कुरेशी हे त्यांचा मित्र व कापड दुकानातील भागीदार फजल पटेल यांच्या मालकीचा पिकअप (एमएच 20 डीई 6059) घेऊन शेख इफ्तेकार नईम यास चालक म्हणून सोबत घेत कपडे आणण्यासाठी निपाणी कडे निघाले होते. पटेल यांच्याकडून चार लाख व स्वतःकडील चार लाख रुपये त्यांनी चालकाच्या सीटखाली ठेवले होते.

बुधवारी (दि. 29) रात्री साडेदहा वाजता ते संभाजीनगरहून निघाले. अहमदनगर, शिरूर, सुपे मार्गे गुरुवारी (दि. 30) पहाटे 5 वाजता ते मोरगाव येथे पोहोचले. तेथून निरेकडे जात असताना शिवशंभो ढाब्याजवळ ते आले असताना एका पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट गाडीने त्यांना अडवले. त्यातून तिघेजण खाली उतरले. त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्यातील एकाच्या हातात चाकू, दुसर्‍याकडे कोयता व तिसर्‍याकडे लोखंडी गज होता. या सर्वांनी मिळून फिर्यादीला धाक दाखवत जवळील पैसे काढून द्या, असे सांगितले. चालक व फिर्यादीला गाडीतून खाली ओढत एकाने इफ्तेकार यांच्या गळ्याला चाकू लावत पैसे कुठे ठेवले आहेत, अशी विचारणा केली. त्यावर या दोघांनी घाबरून आमच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले.

या तिघातील दोघेजण फिर्यादीकडील गाडीत बसले, तर एकाने स्विफ्ट गाडी पुढे घेतली. त्यांनी निराच्या दिशेने पलायन केले. सकाळी सहा वाजेच्या सुमारास चालक इफ्तेकार व फिर्यादीला ढाब्यापासून दीड किलोमीटर अंतरावर त्यांच्याकडील पिकअप बोलेरो वाहन सापडले; परंतु चालकाच्या सीटखाली ठेवलेली आठ लाख रुपयांची रोकड व फिर्यादीचा वाहनात असलेला मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. फिर्यादीने या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता एकाने तो उचलत हा मोबाईल मला मोराळवाडी (ता. बारामती) जवळ सापडला असल्याचे सांगितले. लूट करणार्‍यांनी रस्त्यातच तो मोबाईल टाकून दिला होता.

Back to top button