उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘उज्ज्वला’च्या डोक्यावर पुन्हा सरपणाची मोळी ; रॉकेलही मिळेना अन्…

गणेश सोनवणे

नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा
शासनाकडून रेशनवर मिळणारे रॉकेल बंद झाल्यानंतर देशातील अनुसूचित जातीसह अन्य विविध घटकांमधील सर्वसामान्य महिलांसाठी आरोग्याचा प्रश्न समोर ठेवून 'उज्ज्वला' योजना शासनाने आणली. त्याअंतर्गत सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत. दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळते. सुरुवातीला दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी आता एक ते पाच रुपयांवर आली. गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानंतरही सबसिडी वाढलेली नाही. त्यामुळे जवळपास महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.

'चूल आणि मूल' एवढ्यापर्यंतच मर्यादित असलेली महिला आज शिक्षणाच्या जोरावर पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवित आहे. हातावरील पोट असलेल्या महिलांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो. चुलीवर स्वयंपाक करणार्‍या महिलांमध्ये डोळ्याचे विकार वाढले. त्यामुळे केंद्र सरकारने त्या महिलांना वर्षात 12 गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सबसिडी अधिक मिळत असल्याने कनेक्शनची संख्या भरमसाट वाढली. मात्र, सबसिडी टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आली. तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी मागील काही वर्षांत अवघ्या पाच रुपयांपर्यंत खाली आली. त्यामुळे पुन्हा सरपणाची 'चूल'च बरी, असा सूर सर्वसामान्य कुटुंबातील महिलांमधून निघू लागला. सध्या गॅस सिलिंडरचा दर 1000 रुपयांपर्यंत झाला आहे. हातावरील पोट असलेल्यांना तेवढी रक्कम देऊन सिलिंडर खरेदी करणे परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या गॅस भाववाढीने हैराण झालो आहोत. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. सरपण आणण्यासाठी कसरत करावी लागत असली तरी गॅसच्या दरवाढीवर हाच पर्याय असल्याने चुलीच्या वापराचे प्रमाण अधिक झाले आहे.
– चंद्रकला गारे,
कुंभार व्यावसायिक

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT