नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; कौटुंबिक वादाची माहिती मिळाल्यानंतर तेथील घटनेची माहिती नोंद करत असणाऱ्या दोघा पोलिसांवर एकाने हल्ला करीत लाकही दांड्याने मारहाण केली. या घटनेनंतर संशयित पसार झाल्याची घटना वडाळानाका येथील रेणुका नगर परिसरात घडली.
विकास मुकेश लाखे (रा. रेणुका नगर, वडाळानाका) असे या संशयिताचे नाव आहे. मुंबईनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार मदन बेंडकुळे व नवनाथ उगले हे रविवारी (दि.२४) मध्यरात्री सेवा बजावत होते. त्यावेळी त्यांना मध्यरात्री दीडच्या सुमारास वडाळानाका येथे कौटुंबिक वाद सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघेही अंमलदार तेथे गेले. त्यांनी वादाची माहिती जाणून घेत ती माहिती त्यांना दिलेल्या यंत्रणेवर संकलीत करीत होते. त्यावेळी संशयित विकास लाखे याने पोलिस अंमलदार उगले यांच्याकडील एमडीटी खेचण्याचा प्रयत्न केला. उगले यांनी विकासला अडवले. त्याचा राग आल्याने विकासने लाकडी दांड्याने दोघा अंमलदारांना मारहाण करीत शिवीगाळ केली. यानंतर अंधाराचा फायदा घेत विकासने तेथून पळ काढला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात विकास विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.