27 वर्षांत संपेल पृथ्वीवरचे अन्न | पुढारी

27 वर्षांत संपेल पृथ्वीवरचे अन्न

लंडन : पृथ्वीवरील लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. पृथ्वीवर सध्या सुमारे सात अब्ज इतकी लोकसंख्या आहे. लोकसंख्या वेगाने वाढत असली तरी त्यामानाने अन्नाचे उत्पादन वाढत नाही. यामुळे शास्त्रज्ञांनी इशारा देताना म्हटले आहे की, येत्या 27 वर्षांत माणसाजवळचे अन्न पूर्णपणे संपुष्टात येईल.

शास्त्रज्ञांनी आगामी 27 वर्षांसाठीची वेळ निश्चित केली आणि सांगितले की, 24 एप्रिल 2022 या तारखेपासून आमच्या जवळ आता पुढील 27 वर्षे 251 दिवस पुरेल इतकेच अन्न असेल. 2050 च्या सुरुवातीला माणसाजवळ खाण्यासाठी अन्नाचा एक कणही नसेल.

सोशियो बायोलॉजिस्ट एडवर्ड विल्सन यांनी सांगितले की, माणसाच्या गरजा भागविण्यासाठी सद्यःस्थितीत पृथ्वीसारख्या दोन ग्रहांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्येकाने शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला तर एक दिवस असा येईल की, पृथ्वीवर इतके अन्न असेल की मोठ्या लोकसंख्येचेही आरामात पोट भरेल. विल्सन यांनी पुढे सांगितले की, 2050 मध्ये पृथ्वीवर 10 अब्ज इतकी लोकसंख्या असेल. या सर्वांचे पोट भरण्यासाठी 2017 च्या तुलनेत 70 टक्के जास्त अन्न लागेल आणि पृथ्वी इतक्या लोकांचे पोट भरू शकेल. दरवर्षी वाढणारी लोकसंख्या, वाढत असलेली अन्नाची मागणी या मुद्द्यांचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. यासंबंधीच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठ हजार वर्षांत जितक्या अन्नाचे उत्पादन होत होते, त्यापेक्षाही जास्त अन्नाचे उत्पादन पुढील 40 वर्षांत करावे लागेल; अन्यथा भविष्यात केवळ अडीच अब्ज लोकांचेच पोट भरू शकेल.

Back to top button