उत्तर महाराष्ट्र

Nashik Trimbakeshwar :’त्या’ बिबट्याच्या शोधार्थ ‘सर्च ऑपरेशन’

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या सातवर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींसह काही आदिवासी संघटनांनी थेट वन मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्याने नागपूर वन मुख्यालयातून आलेल्या आदेशान्वये नाशिक वनपरिक्षेत्राचा बंदोबस्त सात दिवसांपासून पिंपळदमध्ये तळ ठोकून आहे. बिबट्याच्या शोधार्थ 'सर्च ऑपरेशन' राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांमध्ये प्रंचड रोष असून, त्यांनी बिबट्याला ठार करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भातही वन मुख्यालयात 'अलर्ट' देण्यात आला आहे.

पिंपळद येथे ६ एप्रिलला सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात प्रगती ऊर्फ देविका भाऊसाहेब सकाळे (वय ७) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकारचे हल्ले त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिक्षेत्रात सातत्याने होत असल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. लोकप्रतिनिधींनी ही बाब थेट वन मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली. राजकीय दबावामुळे वनविभाग 'अलर्ट मोड'वर आला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल १६ पिंजरे तैनात असून, पंचवीस ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध घेतला जात आहे. मंगळवारी (दि.११) वनविभागाकडून डॉग स्क्वॉडलाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे बिबट्याचा माग काढणे पथकाला अवघड झाले होते. पिंपळद परिसरातील ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची हालचाल काहीअंशी चित्रित झाली आहे. ट्रॅप करण्यापूर्वीच बिबट्याने धूम ठोकल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

वनपथकांचा गावात मुक्काम

नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली 'ट्रँक्युलाइज गन'सहित पथक कार्यरत आहे. त्यांच्यासोबतच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, हरसूल आणि सिन्नर या वन परिक्षेत्रातील सर्व अधिकारी-कर्मचारी पिंपळदमध्ये तळ ठोकून आहेत. कोणत्याही परिस्थितीत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने चंग बांधला असून, त्यासाठी इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचीही मदत घेतली जात आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT